

मालेगाव : येथील दरेगाव शिवारात शनिवारी (दि.22) रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास मालमोटार ऑटो रिक्षावर उलटल्याने मोठा अपघात घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दाेन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (three killed two injured after goods vehicle overturned on auto rickshaw in Daregaon)
राष्ट्रीय महामार्गावरील दरेगाव जवळील पर्यायी वळण रस्त्याने मालेगावकडून चाळीसगाव चौफुलीकडे प्रवाशी घेऊन ऑटो रिक्षा जात होती. त्याचवेळी कापडाच्या गाठी भरलेली उलट दिशेने येणारी मालमोटार या रिक्षावर येऊन धडकली आणि अचानक पलटली झाली.
यात रिक्षा मालमोटारीखाली दाबली गेली. रिक्षामधील प्रवासी त्यात अडकले. अपघात घडल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी हात पुढे करत सहकार्य केले. नागरिकांनी मालमोटारीत अडकलेला चालक व सहाय्यकाला बाहेर काढले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मालमोटार हटविल्यानंतर रिक्षामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
अब्दुल कलाम अब्दुल मनान (47), अल्कमा मुख्तार खान (25), व सना कौसर मोहंमद युसुफ (24) अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते मालेगावचे रहिवाशी आहेत. अब्दुल हा रिक्षाचालक आहे. या अपघातात मालमोटार चालक व त्याचा सहाय्यक असे दोघे जखमी झाले असून त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.