

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : येथील देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळ्यामागे असलेल्या एका सलूनमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंगसाठी बसला असताना तीन संशयितांनी युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आणि आरोपी फरार झाले.
युवकाच्या डोक्यावर आणि हाताच्या पंजावर गंभीर मार लागले आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते. जखमी अमन शेख या युवकाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
युवकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याने परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले असून वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांना पोलिसांनी आळा घालावा. आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सी.सी.टीव्हीमध्ये कैद झाला असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.