

नाशिक/दिंडोरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा कमी झालेली नाही. शरद पवार यांच्याबद्दलचा असलेला आदर त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविला आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे सांगतानाच आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असे वक्तव्य झिरवाळ यांनी केले आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले पाहिजे, असे साकडे पांडुरंगाला घातले. या पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ यांना विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करत आहे, विरोधक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना अजित पवार-शरद पवार एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही शरद पवार यांना सोडून गेलो. मात्र, लोकांनी आम्हाला निवडून दिले, असे त्यांनी सांगितले.
दोन्ही पवार एकत्र येण्याची विनंती आपण पांडुरंगाला करतो. मी पांडुरंगाच्या शेजारी शरद पवार यांना पाहतो. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असे सांगतानाच मी ज्या दिवशी अजित पवारांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलेलो नाही. कोणत्या तोंडाने मी त्यांच्यापुढे जाऊ? मला ते प्रभू रामासमान आहे. प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन मी त्यांना फसवले. मला परिस्थितीने हा निर्णय घ्यायला भाग पडले. आता त्यांच्याकडे जात लोटांगण घालून त्यांच्या पाया पडणार आहे. आमच्यासारख्या नेत्यांची स्थिती अवघड झाली आहे. शरद पवार नक्कीच विचार करतील, असेही झिरवाळ यांनी सांगितले.