गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- 'भारत विश्वगुरू होवो, राष्ट्राची शक्ती उत्तरोत्तर वाढत जावो, भारत जगाच्या सर्वोच्च स्थानी राहो' असा संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दक्षिण गंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रामकुंड येथे साधू- महंतांच्या उपस्थितीत पूजन केले तसेच गोदावरीची नियमित आरती या उपक्रमाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंड येथे पोहोचताच साधू- महंतांनी मंत्रोच्चारास प्रारंभ केला. अत्यंत उत्साही मनाने पायऱ्या उतरून ते गोदावरीच्या तीर्थापर्यंत आले. यावेळी त्यांच्या हस्ते गोदावरीची महापूजा करण्यात आली. त्यांनी श्रीफळ आणि पुष्पाचे पाचवेळा अर्घ्य वाहिले तसेच तीर्थाचे मार्जन केले. सौभाग्य मंगलद्रव्य अर्पण करून गोदावरीचे पूजन तसेच अभिषेक केला. यावेळी देशातील बळीराजा सुखी होवो, विपूल पर्जन्यवृष्टी होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. गंगा-गोदावरीची महाआरती या उपक्रमाला त्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी पुरोहित संघाच्या अभ्यागत वहीमध्ये स्वाक्षरी करताना पुरोहित संघाला शुभेच्छा दिल्या.

सिंहस्थाचे अमृतबिंदू रामकुंड या ठिकाणी पडल्याची भावना असल्याने गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पुरोहित संघाचे प्रधान आचार्य सतीश शुक्ल यांनी पगडी परिधान करीत श्रीफळ ठेवलेला चांदीचा अमृतकलश भेट दिला.

यांनी केले पौराेहित्य

पुरोहितांमध्ये दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, वैभव दीक्षित, चंद्रशेखर गायधनी, शेखर शुक्ल, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे, उपेंद्र देव आदींनी मंत्रोच्चार केला. तसेच महंतांमध्ये महंत भक्तिचरणदास, शंकरानंद सरस्वती, अण्णासाहेब मोरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यासह चतु:संप्रदाय व अन्य आखाड्याचे संत- महंत उपस्थित होते.

"जय श्रीराम'चा जयघोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात गोदावरीचे पूजन होत असताना नाशिककरांकडून "जय श्रीराम'चा जयघोष केला जात होता. यावेळी काही नागरिकांनी शंखनाद केला. वास्तविक, नाशिककरांना पंतप्रधानांना बघता आले नाही, मात्र अशातही नाशिककरांचा उत्साह कमालीचा होता. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता

पंतप्रधानांना सिंहस्थाचे निमंत्रण

गोदावरीचे महाआरती झाल्यानंतर पुरोहित संघाच्या वतीने पंतप्रधानांना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले. सतीश शुक्ल यांनी विविध मागण्यांचे निवेदन देताना सिंहस्थासाठी आपण उपस्थित राहावे, अशी आग्रही मागणी केली. त्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याचे शुक्ल यांनी स्पष्ट केले

स्वातंत्र्योत्तर काळानंतर नाशिकमध्ये आतापर्यंत अनेक पंतप्रधान येऊन गेले. मात्र गोदावरीची, रामतीर्थाची, कुंभस्नानाची पूजा करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. नाशिककरांच्या दृष्टीने ही बाब नक्कीच समाधानाची आहे. पंतप्रधान येणे म्हणजेच संपूर्ण देश नाशिक पुण्यनगरीत येणे, असा अर्थ काढता येईल. – सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news