पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नांदूर नाका परिसराच्या मागे-पुढे आणि छत्रपती संभाजीनगर रोडला जोडणाऱ्या एक्साइज भागातील रस्ता खोडून ठेवल्याने परिसरातील वाहन बाजारसह शेकडो व्यवसाय अडचणीत आले आहेत. नांदूर नाका परिसरातून जाणारी मुख्य वाहतूक याच रस्त्यावरून होते, मात्र मॉल्ससमोर खोडून ठेवल्याने दुकानात ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गत सहा महिन्यांत व्यापाऱ्यांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाले आहे.
नांदूर नाका भागात वाहन बाजार आकारास आलेला आहे. येथे किमान साठ छोटे-मोठे मॉल आहेत. नांदूर नाकाच्या मागे-पुढे आणि मॉल परिसरातून येणारे ग्राहक रस्ता क्रॉस करून वाहन बाजारात येतात. मात्र आता मॉल्ससमोर रस्ता खोदून ठेवल्याने रस्ता बंद असल्याचा समज होत आहे. त्यामुळे वाहन बाजाराकडे येण्यासाठी निघालेला ग्राहक रस्त्याची अवस्था पाहून सरळ निघून जात आहे. याचा थेट फटका व्यवसायाला बसून वाहन विक्रीचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती वाहन विक्री व्यावसायिक दत्ता सानप यांनी दिली आहे.
दिवाळी सण हा वाहन खरेदी-विक्रीचा सर्वात मोठा हंगाम असतो. या काळात मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या तोंडावर नांदूर नाका परिसरात मॉल्ससमोर रस्ता खोदल्याने बाजारात शुकशुकाट पसरला आहे. ग्राहकच येत नसल्याने वाहन बाजारातील चालक-मालक आणि इतर व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
नांदूर नाकाच्या मागे-पुढे मॉल्ससमोर रस्ता खोदलेला पाहून आमच्या बाजारात ग्राहक येतच नाही, तो सरळ निघून जातो. प्रशासनाने फक्त रस्ते खोदून ठेवले आहेत. प्रशासनाने तातडीने हा रस्ता लवकर पूर्ण करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वाहन बाजारातील चालक-मालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दिला आहे.