

नांदगाव : सचिन बैरागी
कधी निसर्गाचा लहरीपणा, तर बाजारभावाचा अस्थिरपणा जणू बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यंदाच्या वर्षी अशीच काहीशी प्रचिती वळीराजाला आली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीमुळे शेतातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवरती नवीन पिके उभी करण्याची वेळ आली.
कशीबशी पिकांची नवीन पेरणी करत पिके उभे केली तर त्या पिकांना पाहिजे असा बाजारभाव मिळाला नाही. कांदा, मका, गहू, बाजरी, कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांवर शेतकरीवर्गाची आर्थिक मदार असते. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतमालाला कमी भाव मिळाल्याने पिकांसाठी झालेला खर्चदेखील शेतकऱ्यांना हातात पडणे कठीण झाले. आधी अतिवृष्टी आणि नंतर पडलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले.
सरकारने कर्जमाफीचे गाजर देण्यापेक्षा, शेतमालाला भाव द्यावा. यावर्षी भाजीपाला, दूध यांच्यासह शेतमाल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. यामुळे स्वतःची मजुरी मिळणेदेखील कठीण झाले आहे.
नीलेश चव्हाण, शेतकरी (चांदोरी)