

नांदेड : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला, मुंबईतील 'मंत्रालय', विविध राज्यांतील जिल्हाधिकारी कार्यालये ते अगदी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींपर्यंत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्रदिनी अत्यंत अभिमानाने फडकणारा आपला तिरंगा राष्ट्रध्वज नांदेडमध्ये आकारास येतो. देशभरात खादीच्या अधिकृत राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या मोजक्या चार प्रमुख केंद्रांमध्ये नांदेडचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे तयार होणारा राष्ट्रध्वज तिरंगा देशातील १६ राज्यांत दिमाखाने फडकतो आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात असल्याने गेल्या काही वर्षांत राष्ट्रध्वजाची मागणी प्रचंड वाढली आहे. नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे मुख्य कार्यालय आहे. या संस्थेचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. या संस्थेची सुरुवात १९५५ मध्ये झाली असून, १९६७ मध्ये तिची औपचारिक नोंदणी झाली.
तेव्हापासून या केंद्रात खादीच्या राष्ट्रध्वजांची निर्मिती केली जात आहे. येथे गरजांनुसार ११ वेगवेगळ्या आकारांचे राष्ट्रध्वज शिवले जातात. यामध्ये टेबलवर ठेवल्या जाणाऱ्या अगदी लहान आकाराच्या ध्वजांपासून, वाहनांवर लावण्यात येणारे ध्वज आणि लाल किल्ला व मंत्रालयासारख्या भव्य इमारतींवर फडकणारे १४ बाय २१ फूट आकाराचे भव्य राष्ट्रध्वज तयार केले जातात. या राष्ट्रध्वजांची किंमत आकारानुसार ६० रुपयांपासून ते २१ हजार रुपयांपर्यंत आहे.
राष्ट्रध्वजाचा आकार हा १४×२१ फूट (सर्वात मोठा), ८×१२ फूट, ६×९ फूट, साडेचार×९ फूट, ४×६ फूट, ३×साडेचार फूट आणि २×३ फूट यांसह ११ विविध प्रकारच्या आकारांत ध्वज उपलब्ध असतात.
कापड विणकाम (उदगीर) : राष्ट्रध्वजासाठी लागणाऱ्या विशेष खादी कापडाची निर्मिती लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होते.
रंगकाम व प्रक्रिया : रंगकाम करून उदगीरवरून आलेले हे विशेष खादी कापड रंगगोटीच्या आणि प्रक्रियेच्या कामासाठी अहमदाबाद येथे पाठवले जाते.
अशोक चक्र व अंतिम शिलाई (नांदेड) : कापड पूर्ण प्रक्रिया होऊन नांदेडला परत आल्यानंतर त्यावर अचूक मापाचे 'अशोक चक्र' छापून घेतले जाते. त्यानंतर तब्बल ४५० हून अधिक अनुभवी कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन या राष्ट्रध्वजांची शिलाई करतात.
मुंबई आणि नांदेड या ठिकाणी खादी ग्रामोद्योग नियमांनुसार राष्ट्रध्वज तयार केले जातात. महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड या दोनच केंद्रांवर ही निर्मिती होते. नांदेडहून देशातील सुमारे १६ राज्यांमध्ये हे राष्ट्रध्वज पाठवले जातात.
या केंद्रात वर्षातील ३६५ दिवस राष्ट्रध्वज निर्मितीचे काम अविरत सुरू असते. १ एप्रिल ते ११ ऑगस्ट या अवघ्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीतच सुमारे साडेसात हजार राष्ट्रध्वजांची विक्री झाली असल्याची माहिती ईश्वरराव भोसीकर यांनी दिली. यातून समितीला दरवर्षी ६ ते ७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.