

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-दिल्ली मार्गावरील खंडित झालेली सकाळची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. दिल्लीहून सकाळी ५.४० वाजता विमान निघून नाशिकला ७.२० वाजता पोहोचेल. नाशिकहून ८.३० वाजता निघून १०.३० वाजता दिल्लीला पोहोचेल. सायंकाळची सेवा यापुढेही कायम राहणार आहे.
ऑक्टोबरमध्ये नाशिक-इंदूर आणि नाशिक-जयपूर या नव्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-हैदराबाद मार्गावर दुसरी फेरीही प्रस्तावित आहे. या सेवांना सुरुवात झाल्यास मध्य प्रदेश, राजस्थान आणि दक्षिण भारताशी नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
३१ ऑक्टोबरला सिंहस्थाचे ध्वजारोहण होणार असल्याने त्यापूर्वी हवाई सेवा वाढणे महत्त्वाचे मानले जात आहे. भाविक, पर्यटक, व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना नाशिकला ये-जा करण्याचे पर्याय वाढणार आहेत. पर्यटन, उद्योग आणि व्यापारालाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.