

नाशिक : महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी सुरू केलेला हा लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील फुले वाड्यात अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष भुजबळ यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना 'समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंजुळे यांना एक लाख रुपये रोख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मंजुळे यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. व्यासपीठावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, आ. पंकज भुजबळ, आ. हेमंत रासणे, माजी खा. समीर भुजबळ, मुस्लीम ओबीसी संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, डॉ. शेफाली भुजबळ आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले समताभूमी ही आपल्यासाठी शक्ती केंद्र असून, आपली वैचारिक शक्ती वाढविण्यासाठी आपण या शक्ती केंद्राला भेट देत असतो. आजही फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी एवढे प्रयत्न करूनही समाजातील अंधश्रद्धा दूर झालेली नाही. या महापुरुषांचे विचार घेऊन मंजुळे यांनी सामाजिक वारसा विकसित केला आहे. अंधश्रद्धा दूर करण्याचे काम ते आपल्या चित्रपटांतून करत आहेत. त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याचे सांगितले.
गेल्या काही काळात मराठा आरक्षणाबाबत कुठलाही विरोध केला नसतानाही जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीतही जातीयवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील हे चित्र बदलणार की नाही? असा सवाल भुजबळ यांनी यावेळी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नाही. मात्र, आपले न्याय्य हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल, लढावे लागेल. ही लढाई अद्याप संपलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
माझ्या दिशाहीन जीवनाला महात्मा फुले यांच्या विचारांनी मुख्य प्रवाहात आणले. महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले. आई- वडिलांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हे महापुरुष नसते, तर आपण इतक्या गुण्या गोविंदाने राहू शकले नसतो. आपले सुखकर जीवन या महापुरुषांमुळेच झाले. त्यांच्या पुण्याईनेच आपण इथे आहोत, असे मत मंजुळे यांनी व्यक्त केले.