

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : 'नाफेड'मधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी (दि. १०) गुजरात येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक येथील 'नाफेड' कार्यालयात दाखल झाले. या पथकाने सुमारे तीन तास सलग चौकशी केल्याने अधिकारी व फार्मर उत्पादन कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास 'नाफेड' कार्यालय येथे ठाण मांडून होते. जवळपास तीन तास या पथकाने अधिकाऱ्यांची चौकशी केली. दरम्यान, काही शेतकऱ्यांकडून चौकशी करून त्यांच्या थेट बांधावर जाऊनही पाहणी केली आहे. मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची एक यादी साेशल मीडियात व्हायरल झाली होती. या यादीत नाफेड आणि काही शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या गैरव्यवहरातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. यामुळे कांदा पट्ट्यात खळबळ उडाली होती. याच दरम्यान येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पाहता पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेत घोटाळ्याच्या चौकशीसाठी थेट पथक पाठविले आहे. या दक्षता पथकात गुजरात येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील सरव्यवस्थापिका वीणा कुमारी व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या पथकातील अंकुश साठी यांना निफाडचे शेतकरी किरण सानप, मालेगावचे सचिन मालेगावकर व इतर शेतकऱ्यांनी निवेदन देत कांदा खरेदीचे ऑडिट करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कांदाच लावला नाही, त्या शेतकऱ्यांचा कांदा दाखवून अधिकारी व नेत्यांनी कंपन्यांच्या माध्यमातून गैरप्रकार केला आहे. हा घोटाळा जवळपास 400 कोटींचा आहे. त्यामुळे या कांदा खरेदीचे ऑडिट करावे. त्यात एक शेतकरी प्रतिनिधीचा समावेश करावा. प्रकरणातील अधिकारी, नेते समोर आणावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- किरण सानप, कांदा आंदोलक शेतकरी, निफाड