Nashik Farmers News | शेतकऱ्याचा जुगाड - टाकाऊ वस्तूंपासून बनवला 'मिनी ट्रॅक्टर'

पाहण्यासाठी होतेय गर्दी; शेतीची अनेक कामे मार्गी लागणार
Nashik Farmers News
टाकाऊ वस्तूंपासून बनवला 'मिनी ट्रॅक्टर' Pudhari Photo
Published on
Updated on
भाऊलाल कुडके‌ : नगरसूल, नाशिक

नगरसुल : तालुक्यातील हडप सावरगाव येथील तरूण शेतकऱ्याने आपल्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून व अत्यंत कमी खर्चात घरच्या घरीच जूगाडातून शेतीसाठी उपयुक्त असे पावर टिलर म्हणजेच 'मिनी ट्रॅक्टर' बनवला आहे.

आपल्या खिशातील पैसे वाचवून जर कुठलं काम होत असेल तर ते कोणाला आवडणार नाही. प्रवीण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने हाच विचार करुन शक्कल लढवत अगदी कमी पैशात आणि कमी साहित्यात आपलं काम करु घेता कसे येईल या कल्पनेतून हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. अशा प्रकारे जुगाड करण्यासाठी डोकं लागतं आणि भारतामध्ये अशा डोकेबाज हुशार लोकांची कमी नाही. त्यातील हडप सावरगावातील प्रगतिशील युवा शेतकरी प्रविण शशिकांत कोल्हे हेही एक आहेत. त्यांनी अगदी घरातील टाकाऊ वस्तूंपासुन टिकाऊ वस्तू म्हणजेच पावर विडर, मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे जवळपास घरातच होते. त्याने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हे मशीन बनवण्यासाठी त्यांच्याकडून सखोल माहिती घेऊन हा जुगाड यशस्वी केला आहे.

शेतीची अनेक कामे करता येतील

या पावर टिलर पासून शेतीची वखरणी, फणनी, सारे पाडणे, कोळपणी, बळी नांगर असे अनेक शेतीच्या मशागतीचे कामे करता येणे शक्य आहे.

दिवसेंदिवस मजुरांची संख्या घटत आहे. तसेच नुसते मजुरांच्या भरवशावर शेतीचे काही खरे नाही. तसेच जनावरांना सांभाळने, त्यांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न आहे. या सगळ्यांचा विचार करून प्रवीण आणि त्याच्या वडिलांमध्ये या विषयावर चर्चा झाली. त्यात वडील शशिकांत कोल्हे यांच्यात तर लहानपणापासूनच तांत्रिक गोष्टींमध्ये अंगभूत क्षमता आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे शेतीतील किंवा शेती करताना ज्या तंत्रज्ञानाचा किंवा यंत्रणेचा परिपूर्ण अवजारे बनवण्याचा त्यांचा अभ्यास आहे. या यापूर्वीही त्यांनी कांद्याचा ट्रॅक्टर मार्केटला घेऊन गेल्यावर मुक्कामी राहण्याची वेळ येते व रात्री जमिनीवरच झोपावे लागते. या समस्येवर नामी शक्कल लढवत त्यांनी आपल्या ट्रॉलीच्या पुढील भागात एका व्यक्तीला झोपता येईल असा घडीचा पाळणा तयार केला आहे. त्यावर एका व्यक्तीला व्यवस्थित झोपता येते तसेच आत्ता तयार केलेला जुगाड देखील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

Nashik Farmers News
Maize Import | मका आयात करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध

किती आला खर्च ?

हा प्रयोग गावातील, पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्वांसाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरणारा आहे. हा ट्रॅक्टर बनवण्यासाठी त्यांना अंदाजे मजुरी सोडता 30 हजारांचा खर्च आला आहे.

हा प्रयोग परिसरात व तालुक्यात प्रथम असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी येवला तसेच कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांनी या जुगाडाची दखल घेऊन शुभेच्छा दिल्या. ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ठरणार आहे. यात शंका नाही. येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील तरुण शेतकरी यांनी स्वतःच्या कल्पकतेतून घरी पडलेले निकामी वस्तूंपासून शेती उपयोगी जुगाड बनवले आहे. हे जुगाड पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news