

नाशिक : हद्दीतील खुनाच्या प्रकरणातील फरार ६ आरोपींना इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जत्रा हॉटेल परिसरातून अटक केली आहे.
अमर राजेश महाजन (३६, रा. विश्वनगर), अक्षयकुमार शंकर वागळे (२६, रा. दावळी एजन्सी रोड), अतुल बाळू कांबळे (रा. कुंभारखन पाडा, सुभाष रोड), प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान (२६, रा. अहिरे रोड, समोर नवनाथ मंदिराजवळ), लोकेश नितीन चौधरी (२४. रा. सरोवर नगर, डोंबिवली), निलेश मधुकर ठोसर (४२, आंबेडकर चौक, बदलापुर पूर्व) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. १० नोव्हेंबर रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना हवालदार कुलदीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, मानपाडा पोलिस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील काही संशयित नाशिक परिसरात आल्याची माहिती मिळाली. आहेत.
याबाबत त्यांनी प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे यांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत डी. बी. पथकाला सूचना दिल्या. त्यातच संशयित आरोपी नाशिकहून चाळीसगाव (जि. जळगाव) येथे गेले होते. तेथून एस.टी. बसने पुन्हा नाशिककडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता चाळीसगाव एस. टी. डेपोशी संपर्क साधून बस क्रमांक मिळवण्यात आली. त्यानंतर जत्रा हॉटेल चौक येथे सापळा रचून एस.टी. बसमधून सहाही संशयितांना इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकाने ताब्यात घेतले. आरोपींच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिस ठाणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत पडोळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अंकोलीकर, उपनिरीक्षक संतोष हवालदार, हवालदार कुलदीप पवार, अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, दीपक शिंदे, वाल्मिक पाटील यांच्या पथकाने केली.