

नाशिक : बी. डी. भालेकर शाळा वाचवा समितीच्या धरणे आंदोलनाला आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी करून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शाळा जागेवरच सुरू ठेवावी, अशी मागणी केली.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, शाळेची इमारत ग्राउंड प्लस एक मजली असून मजबूत स्थितीत आहे. ती पाडण्याची गरज नाही. आजूबाजूला गरीब वस्ती आहे, त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेची नितांत गरज आहे. शाळा बंद करून विश्रामगृह उभारणे योग्य नाही.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, मराठी माणूस हद्दपार होऊ देणार नाही. गरज पडल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल. यावेळी बी. डी. भालेकर शाळा वाचवा समितीच्या वतीने आंबेडकरांना निवेदनही सादर करण्यात आले.