Municipal Election : मंत्री कोकाटे-खासदार वाजे यांच्या भूमिकेकडे लक्ष!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम; कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली
Municipal Election : मंत्री कोकाटे-खासदार वाजे यांच्या भूमिकेकडे लक्ष!
Published on
Updated on

सिन्नर (नाशिक) : संदीप भेार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कार्यकर्त्यांना वेध लागलेले असताना राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची रचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे हरकती आणि सूचनांसाठी कार्यकर्ते या क्षणापासून कामाला लागतील यात शंका नाही. आगामी निवडणूक लढविताना आघाडी की, स्वतंत्र याबाबत प्रामुख्याने कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

2024 हे वर्ष सिन्नर तालुक्याच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या तालुक्याला प्रथमच राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमाने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दुसरी बाब गुरू प्रकाशभाऊ वाजे आणि शिष्य अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात बर्‍याच वर्षांनी मनोमिलनाचा अध्याय याच वर्षात लिहिला गेला आणि तिसरे असे की, पाचव्यांदा विधामसभेत गेलेल्या माणिकरावांच्या आमदारकीला मंत्रिपदाचा साजही याच वर्षात चढला.

सिन्नरच्या राजकीय पटलावर एकेकाळी माजी आमदार सूर्यभान गडाख-माजी मंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांच्या निमित्ताने दोन गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून होते. पुढच्या काळात अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिघोळे यांना आव्हान दिले. त्यामुळे काही वर्षे दिघोळे-कोकाटे असे दोन गट राजकीय आखाड्यात होते. अर्थात या काळात कोकाटे यांना ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांचे पाठबळ मिळाले. तथापि, प्रकाशभाऊ आणि माणिकराव यांच्यात काही कारणांनी वितुष्ट आले. त्यामुळे स्व. दिघोळे यांच्यानंतर इथल्या राजकीय रिंगणात वाजे विरुद्ध कोकाटे यांच्यातील डाव-प्रतिडाव बघायला मिळाले. दरम्यानच्या काळात युवा नेते उदय सांगळे आणि राजाभाऊ वाजे यांची गट्टी जमली. त्यामुळे माणिकरावांना तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला. विधानसभेची 2024 ची निवडणूक समोर असताना वाजे-सांगळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव झाला.

Municipal Election : मंत्री कोकाटे-खासदार वाजे यांच्या भूमिकेकडे लक्ष!
Maha vikas Aghadi | महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर

याउपरही महाविकास आघाडीचा धर्म पाळत खासदार वाजे सांगळे यांच्या प्रचारात आघाडीवर राहीले असले तरी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी पडद्याआडून माणिकरावांची पाठराखण केली. या निवडणुकीत सांगळे यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर वाजे आणि सांगळे यांच्यातील संभाषणाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसते. आताशा सांगळे यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे या प्रमुख नेत्यांची काय भूमिका असेल, याबाबत चर्चा झडत आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे सांगळे यांनी सवतासुभा केला आहे. प्रश्न मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे यांच्या भूमिकेचा आहे. याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम दिसतो. तो निवडणुका घोषित झाल्यानंतरच मिटेल, असे बोलले जाते.

सिन्नर, नाशिक
उदय सांगळेPudhari News Network

सांगळे यांच्या पक्षांतराची झडतेय चर्चा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे. तथापि, मध्यंतरी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाची चर्चा झडली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्याशी जुळवून घेता येणार नसल्याने सांगळे भाजपामध्ये जातील, अशी चर्चा होती. ती बहुव्हंशी खरी आहे. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. तसेच भाजपाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याने ते लवकरच कमळ हाती घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सिन्नर, नाशिक
मंत्री कोकाटे यांनी काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांचे बोट धरून शिवसेनेतून काँग्रेसची वाट धरली होतीPudhari News Network

यापूर्वी विकास आघाडीचा यशस्वी प्रयोग!

मंत्री कोकाटे यांनी काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांचे बोट धरून शिवसेनेतून काँग्रेसची वाट धरली होती. ते राणे गटात असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला नव्हता. शिवसेनेतही नाही अन् काँग्रेसमध्येही, अशी त्यांची अवस्था होती. या काळात प्रकाशभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्हा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक विकास आघाडीच्या ‘बॅनर’खाली लढली गेली होती. असा काही किंवा यापेक्षा वेगळा प्रयोग नव्याने होणार का? याकडेही तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news