नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी सुमारे दहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांची जमवाजमव महापालिकेच्या निवडणूक शाखेमार्फत सुरू करण्यात आली असून यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी एक हजार आस्थापनांना पत्र पाठविण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून त्यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात चार सदस्यीय २९ तर तीन सदस्यीय २ अशाप्रकारे ३१ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणही अंतिम करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार, मृत मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस पडला आहे.
तब्बल ९७१७ हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींची प्रत्यक्ष पडताळणी करून सुनावणीची प्रक्रिया पुर्ण केली जात आहे. बुधवारी(दि.१०) प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकेसाठी निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. कर्मचारी नियुक्तीसाठी तब्बल एक हजार आस्थापनांना पत्र पाठवून उपलब्ध कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारी(दि.८) उपायुक्त अजित निकत यांनी यासंदर्भात निवडणूक कक्ष २ ची बैठक घेत आढावा घेतला.
मतदानासाठी १८०० बुथ
महापालिकेसाठी सन २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२५० मतदान केंद्रे(बुथ) उभारण्यात आले होते. यावेळी मतदारांची संख्या पावणे तीन लाखांनी वाढल्याने मतदान केंद्रांच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे. सुमारे १८०० मतदान केंद्रे उभारण्यात येतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरू केली आहे.