नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या 'अमृत ज्येष्ठ नागरिक आणि 'महिला सन्मान योजना' या योजनांच्या प्रचारासाठी एसटी महामंडळाने मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची नेमणूक केली आहे. १५ ऑगस्टपासून या योजनांच्या जनजागृतीसाठी सुरुवात झाली.
'प्रवाशांसाठी मोफत प्रवास', 'सवलतीच्या दरात प्रवास' यासह अनेक योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी प्रवासी राजदूत नेमण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने घेतला. २००३ मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी एसटी प्रवासी राजदुताची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत नेमणूक करण्यात आली होती.
एसटी महामंडळाच्या 'अमृत ज्येष्ठ नागरिक' या योजनेला दिवसागणिक उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड वर्षात योजनेच्या माध्यमातून तब्बल २८ कोटी ६० लाख ज्येष्ठांनी एसटीतून प्रवास केला आहे. यासोबत २०२३- २४ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीटदरात ५० टक्के सवलत जाहीर केले. ही योजना १७ मार्च २०२३ पासून एसटीने 'महिला सन्मान योजना' या नावाने सुरू केली. सध्या दरमहा सरासरी ५ कोटी ७५ लाख महिला या योजनेच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत.