

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा तत्सम दृश्य सामग्री तयार करण्यास प्रतिबंध घालणारे परिपत्रक जारी केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या अशा कृतीमुळे महामंडळाची प्रतिमा, प्रवासी सेवा आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार सर्व विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक आणि कार्यालयप्रमुखांना या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार वाहन चालवताना किंवा कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया कंटेंट तयार करता येणार नाही. आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये महामंडळाची गोपनीय, अंतर्गत अथवा प्रशासकीय माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
महामंडळाविषयी नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, सकारात्मक माहिती, जनहिताच्या योजना, प्रवासी सुविधा, स्वच्छता आणि रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भातील व्हिडिओ अथवा रील्स प्रसिद्ध करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाराची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अधिकृत माहितीच्या प्रसारासाठी आवश्यकतेनुसार वापर करण्यात येणार आहे. त्यांना विविध योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून एसटीच्या सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व कार्यालयप्रमुखांनी या आदेशांची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.