

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेतलेल्या वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भूवैज्ञानिक अधिकारी गट-अ पदांच्या परीक्षेचा निकाल तब्बल १० महिने उलटूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे परीक्षार्थी निकालासह नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या विविध विभागांमध्ये भूवैज्ञानिकांची पदे रिक्त असताना भरती प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भूवैज्ञानिक अधिकारी पदांच्या १२ जागांसाठी एमपीएससीने सप्टेंबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.
या पदांसाठी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी परीक्षा घेतली होती. परीक्षेनंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये उमेदवारांना उत्तरतालिकाही उपलब्ध करून दिली. मात्र, त्यानंतर निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान, संबंधित पदांच्या जाहिरातींच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असल्याचे एमपीएससी सचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ही छाननी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
भूवैज्ञानिक असोसिएशनच्या माहितीनुसार, राज्यातील अभ्यासक्रमातून दरवर्षी भूविज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र, उपलब्ध रोजगाराच्या तुलनेत शासकीय भरतीच्या संधी अत्यल्प आहेत. खनिकर्म विभागातील ३० पदांव्यतिरिक्त आणखी २२ पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
या रिक्त २२ पदांसाठीही खनिकर्म विभागाकडून मागणीपत्र पाठविल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या परीक्षेची प्रक्रिया सुरू असतानाच शासनाकडून आणखी १८ पदांच्या भरतीसाठी मागणीपत्र एमपीएससीकडे पाठविले गेले. मात्र, त्याचीही प्रक्रिया अद्याप पुढे सरकलेली नसल्याची उमेदवारांची तक्रार आहे.
उमेदवारांचे वय निघून जात आहे. अनेकांकडे आवश्यक अनुभव असूनही सरकारी सेवेत संधी मिळत नाही. रिक्त पदे उपलब्ध असताना, परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे. निकाल रखडल्याने परीक्षार्थींमध्ये अस्वस्थता वाढली असून, आता एमपीएससीकडून छाननी प्रक्रिया पूर्ण करून निकाल आणि त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने केली जाण्याची अपेक्षा उमेदवार व्यक्त करीत आहेत.