MP Supriya Sule Nashik | 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'

MP Supriya Sule Nashik | पक्षांतराच्या चर्चांवरून खा. सुप्रिया सुळे यांची मिश्कील कोपरखळी
Supriya Sule
Supriya SulePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात 'ऑपरेशन टायगर- ३', 'ऑपरेशन तुतारी' आणि संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये या सर्व घडामोडींवर उपरोधिक भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'आमचा आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे.

Supriya Sule
Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

रोज आम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षात पाठवलं जातं. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय,' अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांवर चिमटा काढला. त्याचवेळी 'लोकप्रतिनिधींना कमोडिटी बनवण्याचा प्रकार लोकशाहीला शोभणारा नाही,' असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी या अफवांमागील 'सूत्रां'वरही टीका केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात व त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. सुळे म्हणाल्या, 'आम्ही आठ खासदार एकाच व्हॉट्सॲप ग्रुपवर आहोत. रोज टीव्हीवर आम्हाला नवीन पक्षात पाठवले जाते.

आम्ही गमतीने म्हणतो, आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी आहे. आता आम्हाला इंटरनॅशनल करून टाका आणि ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार, असाही जोक आमच्या ग्रुपमध्ये फिरत आहे.'

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील नेते आणि खासदार सत्ताधारी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देताना, 'आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. आमचा एकही खासदार पक्षाविरोधात बोललेला नाही,' असे स्पष्ट केले.

राज्यातील वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा विळखा यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. कांद्याचे दर, इगतपुरीतील भूसंपादनग्रस्तांचा प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीच्या अपुऱ्या अंमलबजावणीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

'कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; पण अंमलबजावणी झाली नाही. कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. भूसंपादनग्रस्तांना न्याय मिळाला हवा,' असे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्या, उज्जैन आणि सिद्धिविनायकासारख्या मंदिरांतील कथित भ्रष्टाचाराच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त करताना 'श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतील,

तर यापेक्षा गंभीर बाब कोणती? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर त्यांच्याच पक्षप्रवेशाला मान्यता दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

'लाडकी बहीण' योजनेची एसआयटी चौकशी करा

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विशेष तपास पथकाच्या चौकशीची मागणी केली. 'सरकार आधार आणि जनधन योजनेचे यश सांगते. मग लाखो महिलांचे केवायसी का झाले नाही? योजनेत पुरुष आणि सरकारी कर्मचारी लाभार्थी कसे झाले? या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे,' असे त्या म्हणाल्या.

लवकरच गोड बातमी कळेल

पवार कुटुंबातील लग्नसराईचा उल्लेख करताना खा. सुळे यांनी 'आमच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. युगेंद्र, जय, रेवती यांच्यानंतर आता पार्थ पवारच्या लग्नाची तयारी सुरू आहे. आणखी एक गोड बातमी लवकरच तुम्हाला कळेल,' असे सांगत त्यांनी उपस्थितांची उत्सुकता वाढवली.

Supriya Sule
West Bengal Politics | पुत्रमोहाचे राजकारण

पक्षांतर करणाऱ्यांनी पुन्हा जनतेसमोर जावे

लोकप्रतिनिधींच्या पक्षांतरावर कठोर भूमिका घेत त्यांनी संसदेच्या आगामी अधिवेशनात खाजगी विधेयक आणण्याची घोषणा खा. सुळे यांनी केली. 'ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात, त्याच पक्षात पाच वर्षे राहिले पाहिजे. पक्ष बदलायचाच असेल, तर आधी राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेचा कौल घ्यावा. जनतेने दिलेल्या मतांचा विश्वासघात होता कामा नये,' असे त्या म्हणाल्या.

'श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतील, तर यापेक्षा गंभीर बाब कोणती? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news