

Mother's Day 2025
ललिता मोहन पवार यांचा जीवनप्रवास म्हणजे दु:ख, संघर्ष आणि जिद्दीने यश मिळविण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. ललिताचा जन्म झाल्यानंतर केवळ दीड वर्षातच आईचे निधन झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओ झाल्यामुळे शारीरिक अपंगत्व आले. लहान मुलांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे वडिलांनी पुन्हा लग्न केले. मात्र सावत्र आईने देखील काळजी घेतली नाही. म्हणून ललिताला मामाकडे पाठवण्यात आले.
स्वा.सै. काकासाहेब भामरे अपंग कल्याण केंद्र, ता. सटाणा येथून शिक्षण पूर्ण केले. (सन 2000 पूर्वी) बोर्डिंग शाळेला शासकीय मान्यता नव्हती. त्यामुळे शालेय शिक्षणासाठी स्वतःचा खर्च करावा लागत असे. वह्यांच्या कोऱ्या पानांपासून स्वतः वही तयार करून अभ्यास करावा लागायचा. शाळेतून फक्त पुस्तके आणि गणवेश मिळायचा. जेवण फक्त सकाळ-संध्याकाळ मिळायचे.
आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील वर्ष नववीसाठी पुन्हा वडगाव, ता. मालेगाव येथे मूळ गावी ललिता आली. पण आर्थिक अडचणीमुळे आणि मामाकडे असलेल्या जबाबदाऱ्या अधिक असल्यामुळे केवळ 15 व्या वर्षीच तिचे लग्न मुंजवाडा (ता. सटाणा) येथे लावण्यात आले. नवरा व्यवसायाने ड्रायव्हर होता, मात्र तो नेहमी मद्यधुंद राहत असे. ललिताला शेतीकामाचे ज्ञान नव्हते, तरीही तिने शेतीकाम शिकून संसाराचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला.
कोरोना काळात परिस्थिती अत्यंत बिकट झाली. त्यावेळी तिने तीन चाकी स्कूटीवर पहाटेपासून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नवरा पूर्णपणे दारूच्या आहारी गेल्याने त्याने तिला सोडून दिले. आजही तो कुठे आहे याची ललिताला माहिती नाही. ललिता आता नांदुरनाका येथे राहत असून तिच्या कुटुंबात ती आणि मुलगा असे दोघेच आहेत. मुलीला चांगले शिक्षण देऊन तिचे लग्न तिने नातेवाईकांमध्ये केले असून मुलगा १२ वी सायन्स नंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात अनुभव घेत आहे. घरासाठी घेतलेला कर्जाचा हफ्ता फेडण्यासाठी ललिता अथक परिश्रम करत आहे.
प्रहार दिव्यांग संघटनेतून आणि कैलास चव्हाण यांच्यासारख्या मदतीच्या हातांमुळे ललिताच्या जीवनाला दिशा मिळाली. दिव्यांग असल्यामुळे सुरुवातीला सुरक्षारक्षकासारखी नोकरी शोधली पण तिथे दिव्यांगत्वामुळे नाकारण्यात आले. इंग्रजी भाषेची अडचणही होती. यावेळी ‘युथ फॉर जॉब फाउंडेशन’ मार्फत दिड महिन्यांचे प्रशिक्षण मिळाले. त्यातून ‘न्यू मोशन’ई वाहन मिळाले आणि फूड पार्सल व्यवसायास सुरुवात झाली.
सध्या ललिता दररोज 25-30 किमीपर्यंत फूड पार्सल वितरित करते आहे. पहिल्याच दिवशी 10 ऑर्डर पूर्ण करत तिने संघर्षाची खरी सुरुवात केली. आज 20-25 पार्सल्स नियमितपणे ती पोहोचवते. नागरिकांकडून मिळणारा सन्मान आणि “ग्रेट कामाची” थम करुन दिलेली पावती तिच्या मेहनतीचे दर्शन घडवते . छावा जनक्रांती दिव्यांग संघटनेच्या नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा म्हणूनही ती कार्यरत असून अनेक दिव्यांग महिलांना ललिताने मदतीचा हात दिला आहे.
“दिव्यांगत्व म्हणजे मर्यादा नव्हे, ती जिद्दीची सुरुवात आहे. एक पाऊल उचलले की भगवंत आपल्याासाठी हजार पावले चालत येतो. हार मानू नका, चिकाटी ठेवा, यश नक्कीच मिळेल.” असे ललिताचे म्हणणे आहे. आज ती केवळ आईच नव्हे, तर आई-वडील दोन्हीची भूमिका पार पाडणारी एक यशस्वी महिला आहे. संघर्षातून ती आज समाधानाचे, स्वाभिमानाचे जीवन जगत आहे. खरेच, मातृदिनाच्या दिवशी तिच्या कष्टांना सलाम!