नाशिक : हवामान विभागाच्या मते, दि. १४ सप्टेंबरपासून पावसाने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. याच परतीच्या पावसाने गुरुवार (दि.१८) धो-धो हजेरी लावल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसांच्या सरींनी सर्वत्र दाणादाण उडवून दिली. तब्बल तासभर बरसलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. गुरुवार (दि.१८) रात्री देखील शहरात सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सकाळी नोकरदारवर्गाची कामावर जाण्यासाठी तारांबळ उडाली.
यंदा ७ मे पासून पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी अवकाळी पावसाने नागरिकांचे हाल केले. त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, जिल्ह्यातील सर्वच धरणे तुंडूब भरली. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, पुढील काही दिवस पाऊस दमदार बरसण्याचा अंदाज आहे. गुरुवारी दुपारी अचानकच आभाळात ढग दाटून आले होते. काही वेळातच सर्वत्र काळोख निर्माण झाला होता. ४ वाजून २० मिनिटांनी पावसाने बरसण्यास सुरुवात केली. जोरदार सरींनी रस्ते पाण्याखाली गेले हाेते.
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी ५ वाजता ज्या शाळा सुटतात, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला. शहरातील रस्ते अगोदरच खड्ड्यांनी व्यापल्याने, त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच कसरत बघावयास मिळाली. अनेक भागात पाणी साचले. सातपूरमधील श्रमिकनगर, शिवाजीनगर या भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. दरम्यान, परतीचा पाऊस असाच अचानक बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविल्याने, नाशिककरांना अशाप्रकारच्या पावसाचा पुढील काही दिवस सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. सिग्नल सुरू असताना नागरिकांनी त्याचे पालन न केल्याने, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता वाहन धारकांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही समोर आले. वाहतूक पोलिस नसल्याने, उशिरापर्यंत वाहन धारकांनी कोंडी फोडत वाहनांना मार्ग काढून दिल्याचे दिसून आले.
देवळाली कॅम्प: परिसरात गुरुवारी (दि.18) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील सर्व गल्ल्यांना नदीचे स्वरूप आले. सायंकाळी सुमारास देवळाली कॅम्प,भगूर व परिसरात जोरदार पाऊस झाला. रेणुका माता मंदिर व केंद्रीय विद्यालय दरम्यान रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. पाणी निचरा होण्यास जागा नसल्याने पूरासारखी स्थिती निर्माण झाली होती.