

सावकारी जाचातील वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर
साथीदाराच्या मदतीने महिलेला अमानुष मारहाण, विनयभंग करत वसुली
उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
नाशिकरोड : शिखरेवाडी परिसरात खासगी सावकार महिलेने आपल्या मुलासह आणि आणखी एका साथीदाराच्या मदतीने महिलेला अमानुष मारहाण करत तसेच तिचा विनयभंग करत पाच लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल 38 लाख 45 हजार रुपयांच्या वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी खासगी सावकार सारिका अशोक किर (45) यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून ओळख होती. २०१८ मध्ये पीडितेला आलेल्या आर्थिक अडचणीत तिने किरकडून पाच लाख रुपये मासिक पाच टक्के व्याजाने घेतले होते. ती दरमहा 25 हजार रुपये व्याज देत होती. उशीर होताच किर पीडितेला शिवीगाळ, मारहाण करत असे. तसेच तिच्या मुलांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
डिसेंबर 2022 पासून किरने व्याजदर वाढवून 10 टक्के केला आणि दरमहा 50 हजार रुपये घेण्यास सुरुवात केली होती. मुलांच्या नोकरीतील पैसे, स्वतःच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न सर्वकाही किरकडे जात होते. डिसेंबर 2023 मध्ये काही महिन्यांचे व्याज थकल्यानंतर किरने पीडितेला घरी बोलावून पुन्हा धमकावले. तसेच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने पाच तोळ्यांचे दागिने ओळखीच्या महिलेमार्फत गहाण ठेवले आणि किरला दीड लाख रुपये दिले. हप्ता थकल्यावर किर आणि तिचा मुलगा अमनने पीडितेला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
अमनने अश्लील स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने आपले घरच सोडले. परंतु तरीही किर फोनवर सतत धमक्या देत होती. 2 जूनला पीडितेने किरच्या मुलाच्या खात्यावर 10 हजार रुपये पाठवले, तरी किरने व्याज दिले नाही म्हणून पीडितेच्या घरातील 2.95 लाख रुपयांच्या वस्तू वॉशिंग मशीन, दुचाकी, सोन्याचा गणपती व सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने उचलून नेल्या. त्याआधी पीडितेने घर गहाण ठेवून 2 लाख आणि पतीच्या पीएफमधून साडेतीन लाख रुपये देऊनही किरचा त्रास थांबला नव्हता. 29 जुलैला सारिका किर, तिचा मुलगा अमन आणि खान नावाच्या इसमाने पीडितेच्या घरी येत तिला अमानुष मारहाण केली. त्याच वेळी अमन आणि खान यांनी तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितेच्या मुलाने पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी पोहोचले. तिघे संशयित घरात उपस्थित होते. या तिघांनी पोलिसांशी अरेरावी केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खासगी सावकार मायलेकासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे अधिक तपास करीत आहेत.