

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, महागाईची झळ गणरायाच्या प्रसादालाही बसली आहे. साखरेसह तेल, दूध आणि इतर साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे मिठाईचे भाव सुमारे ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे दरवर्षी किलोभर मिठाई खरेदी करणाऱ्या नागरिकांना यंदा पावशेरवर समाधान मानावे लागत आहे.
मोठ्या प्रमाणात प्रसाद खरेदी करणाऱ्या भाविकांनीही खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोदक अन् मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक, पेढे आणि विविध मिठाई खरेदी केली जात आहे.
मात्र, वाढत्या दरांमुळे खरेदीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पूर्वी पाच ते दहा किलो प्रसाद घेणारे भाविक आता दोन ते तीन किलोवर आले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी किलोभर मिठाई घेणारे ग्राहकही पावशेर किंवा अर्धा किलो खरेदी करत आहेत.
मिठाईतील भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांवर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने व्यावसायिकांमध्येही खबरदारीचे वातावरण आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमुळे मिठाई उत्पादक दर्जेदार साहित्य वापरण्यावर भर देत आहेत.
उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी आहे. मोदक करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागत असल्याने अनेक महिला तयार मोदक खरेदी करण्यास पसंती देत आहेत. नागरिकांच्या आवडीनुसार मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. मावा, केशरी, मँगो, चॉकलेट, सुकामेवा, डाएट, शुगर फ्री, गुलकंद-पान आणि वेलची मावा मोदकांना मागणी आहे. तळलेले मोदकही खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
"प्रसादाचे व मिठाईचे किलोमागे २० ते ४० रुपयाने भाव वाढले असले तरी श्रद्धा असल्याने ग्राहक येत आहेत. पण जे ग्राहक एक किलो प्रसाद किंवा मिठाई घेऊन जात होते, ते आता फक्त पावशेर ते अर्धा किलो घेऊन जात आहेत."
- ललति वाघ, 'बुधा हलवाई'चे मालक