

मनमाड (नाशिक) : नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ दिवसांत ऑफलाइन १, तर ऑनलाइन तब्बल १६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि. १७) आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका देखील मालामाल झाली असून आतापर्यत सुमारे २५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या ३३ जागांसाठी १० नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवाराला प्रथम ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्डकॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागत आहे. १४ नोव्हेंबरपर्यत ४ दिवसात ऑफलाईन एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. ऑनलाईन तब्बल १६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. उमेदवार आणि सूचक पालिकेचे थकबाकीदार नसावे असा नियम असल्याने त्यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर भरल्यामुळे पालिका मालामाल होत आहे. यासह उमेदवाराला अनामत रक्कम २ हजार तर राखीव आणि महिला उमेदवासाठी १ हजार रुपये भरावे लागत आहे. चार दिवसात पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.