Nilesh Rane Press Conference | दोन नंबर धंद्यातून पोलिसांना मिळते अडीच कोटींचे कमिशन

Nilesh Rane Press Conference | दोन नंबर धंद्यातून पोलिसांना मिळते अडीच कोटींचे कमिशन
Nilesh Rane
नीलेश राणे
Published on
Updated on

ओरोस : पुढारी वृत्तसेवा

मटका, जुगार, दारू, तस्करी यासारख्या दोन नंबर धंदेवाल्यांकडून पोलिसांचे कलेक्शन सुरू आहे. यातून पोलिसांना दरमहा कमीतकमी सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांचे कमिशन मिळते. हा आकडा यापेक्षाही अधिक असू शकेल. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन अधिकारी जिल्ह्यात हप्ते जमा करण्याचे काम करतात. गोव्यातून दारू वाहतूक करणाऱ्या एकाच नंबरच्या तीन गाड्या फिरत आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही?. पोलिस अधिक्षकांच्या या निष्क्रीय कारभारामूळे आमचे सरकार बदनाम होत आहे. ते जोपर्यंत येथून जात नाहीत तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असा इशारा आ. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. आ. राणे म्हणाले, आपण स्वतः या सरकारचा भाग आहे, त्यामूळे जिल्ह्याच्या हितासाठी मला बोलावे लागत आहे. पोलिस अधीक्षक मोहन दहिकर हे कधीही रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसले नाहीत. ते आल्यापासून फक्त बदली मागून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला काम करायची इच्छा नसेल त्याला तात्काळ हाकलून दिले पाहिजे. यापूर्वीचे पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी अवैध धंद्यांसह स्पिरीट टँकरवर धडक कारवाई केली होती, मात्र सध्याच्या अधीक्षकांनी राजकीय तडीपारी व्यतिरिक्त काहीही केलेले नाही. पोलिस अधिक्षकांच्या कारभाराच्या तक्रारींचा पाढा वाचत या प्रकरणी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आ. नीलेश राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, दोडामार्गमध्ये रबर शेतीच्या नावाखाली तब्बल १८०० हेक्टर जमिनीवर गांजा लागवड केली आहे. तिथे दहशतीमुळे स्थानिक लोक जाऊ शकत नाहीत, मग पोलिस तिथे कारवाई का करत नाहीत? जिल्ह्यात बिफ (गोमांस) कुठे मिळते हे जगजाहीर असूनही पोलिस कारवाई करत नाहीत आणि गो-तस्करीवर मोका लावला जात नाही, असा आरोपही आ. राणे यांनी केला. मशिदींवरील भौग्यांबाबत तक्रार करूनही पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. एलसीबीच्या एका अधिकाऱ्याने आवळेगाव येथे एकाला दारूधंदा सुरू करायला पाठबळ दिले आणि त्याच्याकडून हफ्ता मिळाला नाही म्हणून त्याला अटक केली. याशिवाय पत्रकारांनाही खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची अरेरावी पोलिसांकडून सुरू आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणारा पोलिस अधीक्षक जिल्ह्यात नकोच परंतु पोलिस खात्यातही नको अशी आपली भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.

वैभव नाईकांनी माझ्या सुरक्षेची काळजी करू नये

माजी आ. वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना आ. नीलेश राणे म्हणाले, 'माझी पोलिस सुरक्षा कमी झाली म्हणून मी हे आरोप करतोय असा दावा वैभव नाईक करत आहेत, पण मुळात सुरक्षा कमी करण्याचे अधिकार पोलिस अधीक्षकांना असतातच कुठे? माझी सुरक्षा अजिबात कमी झालेली नाही. ते स्वतः गेले १० वर्षे आमदार होते, ते मोठे विद्वान आहेत. त्यांच्या घरातील दोन नगरसेवक कणकवलीत निवडून आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे, हे त्यांनी विसरू नये', असा टोला आ. राणे यांनी वैभव नाईक यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news