

Maharashtra ministers Celebration Bhau Beej
जळगाव, रायगड, संभाजीनगर : दिवाळीतील भावाबहिणींचे नाते दृढ करणारा भाऊबीज सण आज (दि.२३) राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री भरत गोगावले आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही भाऊबीज सण पारंपरिक आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. मंत्र्यांनी बहिणींना ओवाळून भेटवस्तू दिल्या, तर बहिणींनी भावांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक सणांच्या माध्यमातून कुटुंबातील आपुलकी आणि बंध मजबूत होतात, असे मत मंत्र्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी यावल तालुक्यातील बारी पाडा या दुर्गम आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटला. त्यांच्या उपस्थितीने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या भेटीदरम्यान त्यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातची पारंपरिक ठेचा-भाकरचा अस्सल स्वाद घेतला. ग्रामीण चुलीवर शिजवलेली भाकर आणि ठेचा खाताना त्यांनी आदिवासी संस्कृतीशी एकरूप होऊन “ही खरी आपुलकीची दिवाळी आहे” असे मनापासून म्हटले. या दृश्याने संपूर्ण वस्ती आनंदात न्हाऊन निघाली. यावेळी महाजन यांनी बारी पाडा आणि लगतच्या गावांना दत्तक घेतल्याची घोषणा केली.
या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी ‘गिरीश महाजन दुर्गम भागात येऊन आम्हाला दिवाळीचा खरा आनंद देऊन गेले. आमच्यासोबत बसून जेवले, हा क्षण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू, असे सांगत भावनिक कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमावेळी आमदार अमोल जावळे, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, केतकी पाटील, नंदू महाजन, डॉ. फेगडे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, अरविंद देशमुख, उमेश फेगडे, सागर कोळी, अतुल भालेराव, रवींद्र सूर्यभान पाटील, उज्जैन सिंग, राजपूत आदी उपस्थित होते.
भाऊबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली. पारंपरिक रितीरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हातांनी मंत्री गोगावले यांना तिलक लावून आरती करून ओवाळणी केली. यावेळी आदिवासी भगिनींनी परतबागेतील केळी आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली.
मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमळ भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुखसमृद्धीची शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू, असा विश्वास यावेळी मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. ग्रामीण आणि आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला. गोगावले यांनी त्यांची सखी बहीण राहत असलेल्या किए गावात जाऊन भाऊबीज साजरी केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिरसाटांच्या बहिणींने त्यांचे औक्षण करून मिठाई भरवून तोंड गोड केले. तर त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी घरी आलेल्या शिवसैनिकांना ओवळत भाऊबीज सण साजरा केला.
आम्ही दरवर्षी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना घरी बोलावून भाऊबीज साजरी करत असतो. त्यामुळे आपलुकीचे नाते घट्ट होण्यास मदत होते, असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.