

सांगली ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे.
प्रत्येकवर्षी कर्मचाऱ्यांना भाऊबीज देण्यात येते. मात्र दिवाळीनंतरच भाऊबीज मिळते, असा कर्मचाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण यंदा मात्र दिवाळीपूर्वीच शासनाने पैसे वर्ग करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या अनेक योजना निधीअभावी रखडल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्याची तत्परता शासनाने दाखविली आहे.
जिल्ह्यात 2 हजार 703 अंगणवाडी सेविका आहेत, तर 2 हजार 250 मदतनीस आहेत. एकूण 4 हजार 953 जणींच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एकूण 99 लाख 6 हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरू होती. राज्यातील 1 लाख 10 हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीज देण्यात येत आहे. त्यासाठी 40 कोटी 61 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने “आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या” अशी मागणी केली होती. 2 हजार रुपयांची भेट नको, तर किमान एक वेतन बोनस म्हणून द्या, अशी त्यांची मागणी होती. इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो, मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही? असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता. पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.