

नाशिक : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढण्यात आल्याने अन् यापूर्वीचे कृषीमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावरून राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. 'मी फक्त माझ्या खात्याकडेच बघते' असे त्या म्हणाल्या.
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित 'एअरोनॉमिक्स २०२५' या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी कृषीमंत्री बदलाबाबत त्यांना विचारणा केली. तसेच कृषीमंत्री सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे त्यांना विचारले असता, 'असे विषय मी मांडत नाही. तसेच मंत्री असल्यामुळे कोणी अडचणीत येतो, असे मला वाटत नाही. त्यामुळे असे म्हणणे योग्य नाही. मी त्याकडे बघतच नाही. मी फक्त माझ्या खात्याकडेच बघते.' असे म्हणत त्यांनी याविषयी बोलणे टाळले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मला वेळोवेळी नाशिकला यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभाचे सुक्ष्म नियोजन करीत आहेत. गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. सिंहस्थ-कुंभमेळ्यांचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर मी व्हावे, असे कार्यक्रमात म्हटले आहे. मात्र, त्याबाबत सांगणे अवघड असले तरी, गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही मंत्री मुंडे म्हणाल्या.