

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नव्हे, तर मराठी भाषेमुळे, मराठी माणसाच्या रेट्यामुळे एकत्र आल्याचा दावा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र आले असले, तरी त्यांचे मनोमिलन किती होते, ते पुढे पाहावे लागेल असे सांगत, भुजबळांनी ठाकरें बंधूंना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.
मराठी भाषा सक्तीचा निर्णय महायुती सरकारने मागे घेतल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू प्रथमच एकत्र आले. या मेळाव्यात ठाकरे बंधूंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. याबाबत नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी फडणवीस यांची बाजू घेतली. ठाकरे बंधू फडणवीसांमुळे नव्हे, तर मराठी भाषेमुळे एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्राबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच याबाबतचे आदेशही स्थगित केले आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक ती पावले उचलली असल्याचा दावा भुजबळांनी केला. राज्यात ठाकरे, पवार कुटुंब एकत्र येत असतील, तर त्याचा सगळ्यांना आनंदच आहे. यात वाईट वाटण्याचे कारण नाही. त्यांचे राजकीय विचार जुळताहेत का याचाही विचार करावा लागेल, असे सूचक वक्तव्य करताना बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्या कारणांचे काय झाले, असा सवालही भुजबळांनी यावेळी उपस्थित केला. कांदा दर घसरल्याबाबत, आम्ही कळवले असून, वारंवार निर्यात बंद करू नका ही आमचीदेखील मागणी असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.
मराठी बोलणारच नाही, अशी भूमिका घेत ठाकरेंना आव्हान देणाऱ्या उद्योजक केडियांवरही भुजबळांनी निशाणा साधला. मराठी माणूस ज्या राज्यात गेले आहेत, त्या ठिकाणी ते त्या राज्याची भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही, ही भूमिका काही बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. तसेच जी मंडळी मराठी बोलणार नाहीत, असे सांगतात, ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करताना गुजराती समाजाचा कार्यक्रम होता आणि वातावरणही होते त्यामुळे ते म्हणाले असतील, अशी सारवासारवही भुजबळ यांनी केली.