

मुंबई : मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजयी मेळावा आज (दि.५) झाला. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांचं ऑफिस फोडलं. यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
मुंबईतील सुशील केडिया यांनी हिंदी भाषेवरून राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिलं होतं. आज मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केडिया या उद्योजकाला प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर केडिया याने एक्स पोस्टवर "मी @RajThackeray जी यांना नम्र विनंती करतो की, कृपया माझ्या निवेदनाचा विचार करावा" असे म्हणत माफी मागणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
सुशील केडिया याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "मी जे काही बोललो ते चुकीच्या मानसिकतेतून आणि तणावातून बोललो. माझ्या 'त्या' विधानाचा चुकीचा अर्थ काढून काहींनी वाद निर्माण केला. मुंबईत मी गेली ३० वर्षे राहूनही मला मराठी येत नाही. माझी चूक झाली आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन. मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन" असेही त्यांनी एका व्हिडीओतून म्हटलं आहे.
मनसेचे कार्यकर्ते केडिया यांच्याविरोधात आक्रमक झाल्यानंतर सुशील केडिया यांनी राज ठाकरेंकडे विनंती करत आपण वक्तव्य मागं घेतल्याचं म्हटलंय. केडिया यांनी ४ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मी ३० वर्षांपासून मुंबईत राहूनही एक मूळचा मराठी माणूस ज्या पद्धतीने मराठी बोलतो तसं मी बोलू शकत नाही. यामुळे कोणताही संभ्रम निर्माण होतो, म्हणून मी सगळीकडे मराठी बोलत नाही. फक्त जवळच्या लोकांसोबतच मराठीमध्ये बोलतो. जर मी चुकीच्या पद्धतीने उच्चार केले, बोललो तर काही लोक मराठीचा अपमान म्हणून ते दाखवतील अशी भीती केडिया यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, मी त्यावेळी खूपच ओव्हररिअॅक्ट झालो. पण राज ठाकरे ज्या पद्धतीने हिंदुत्त्व, राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करतात, त्यावरून मी कित्येकदा त्यांचे कौतुक देखील केले आहे. तणावामुळे मी भावनिक होत प्रतिक्रिया दिली ती माझी चूक झाली. मी राज ठाकरे यांना विनंती करतो की, माझ्या चुकीची जाणीव झालीय आणि मला ती दुरुस्त करायची आहे. मला आशा आहे की, बिघडलेलं वातावरण चांगलं करण्याचा लोक प्रयत्न करतील. यामुळे मराठी न घाबरता बोलता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुशील केडिया यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली होती. मराठी शिकणार नाहीच, अशी भूमिका सुशील केडिया यांनी मांडली होती. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला”, असं केडियांनी म्हटलं होतं.