

नाशिक : म्हाडा घोटाळ्याची दिवसेंदिवस व्याप्ती वाढतच असून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे कारनामे थक्क करणारे आहेत. भूमी अभिलेख विभागाचा मेंटेनन्स सर्वेअर श्रीकांत प्रकाश परदेशी (४२) याने भूमी अभिलेख कार्यालयात रात्रभर बसून बनावट नकाशे तयार केले आणि त्यावर स्वाक्षऱ्या व नोंदी केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्याच्या या 'रात्रीस खेळ चाले' गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने परदेशीच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली आहे.
परदेशी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. मात्र, त्यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नसले तरी, त्याने शासकीय कार्यालयाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. अर्थात यासाठी त्यास काही संशयितांनी देखील मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे.
दरम्यान, परदेशी यास शुक्रवारी (दि.१०) न्यायालयात हजर केले असता, त्यास आणखी एका दिवसाची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्याला रविवारी (दि.१२) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्याकडून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. परदेशी याने विकासकांचा फायदा करण्यासाठी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे उघड होत आहे. परदेशी व काही संशयितांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयातच बसून जमिनीचे तुकडे पाडणारे आणि क्षेत्रफळ ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी दाखवणारे हुबेहूब बनावट नकाशे तयार केले आणि ते हस्ताक्षरित केल्याची माहिती उघड होत आहे.
दरम्यान, परदेशीच्या या रात्रीच्या खेळात कार्यालयातील आणखी कोणाचा समावेश होता, त्याला कोणी मदत केली. बाहेरील कोणत्या मध्यस्थांचा तसेच बांधकाम व्यावसायिकांचा यात सहभाग होता काय? या सर्व बाबींचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या पथकाने या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी झालेली ही सहावी आणि भूमी अभिलेख विभागातील दुसरी अटक असून, आणखी 'बडे मासे' गळाला लागण्याची शक्यता आहे.
म्हाडाची कोट्यवधींची फसवणूक
परदेशीचे अनेक कारनामे समोर येत असून, त्याने म्हाडाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे. राज्य शासनाच्या २०१३ च्या गृहनिर्माण धोरणानुसार, ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर प्रकल्प उभारताना २० टक्के जागा म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, परदेशीने नकाशांमध्ये फेरबदल करून म्हाडाची फसवणूक केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नकाशांची फॉरेन्सिक तपासणी केली असता, त्यावरील खाडाखोड आणि फेरबदल थेट परदेशीच्याच हस्ताक्षरात असल्याचे समोर येत आहे.