

नाशिक : महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमधील कथित अवैध गर्भपात प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण व सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत शेटे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
पंड्या हॉस्पिटल २००९ पासून परवाना नूतनीकरणाअभावीही सुरू होते. त्यामुळे या काळात महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकपदावर काम केलेले सातही वैद्यकीय अधीक्षक, सहायक वैद्यकीय अधीक्षक, महात्मानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती शासनाच्या आरोग्य विभागाने मागविली आहे. त्यामुळे आता या सर्वच अधिकाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागणार असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पिंपळद येथील गर्भवती व तिच्या अर्भकाचा मृत्यू पंड्या हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर झाला होता. याबाबत माता मृत्यू संशोधन समितीचे पथक तपासणीस गेले असता, त्या ठिकाणी अवैध गर्भपातासाठी वापरला जाणारा औषधसाठा आढळला होता. डॉ. चव्हाण, डॉ. शेटे, डॉ. नितीन रावते यांचा या पथकात समावेश होता. पंड्या हॉस्पिटलने २००९ पासून वैद्यकीय विभागाकडील परवाना नूतनीकरण केलेले नव्हते. त्यामुळे हे हॉस्पिटल अनधिकृत असल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. परंतु, या कारवाईत अवैध गर्भपात प्रकरणाचा कुठलाही ठपका पंड्या हॉस्पिटलवर ठेवला गेला नसल्याने यात रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घातले गेल्याचा आरोप करत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पंड्या हॉस्पिटलवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉ. चव्हाण व डॉ. शेटे यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी समितीचे सदस्य डॉ. सुनीता गोलाईत आणि डॉ. सांगळे आणि उपसंचालक कपील आहेर यांनी दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून चौकशी करत अहवाल शासनाला सादर केला आहे.
२००९ पासून पंड्या हॉस्पिटलचा परवाना नूतनीकरण न करताच रुग्णालय अनधिकृतपणे सुरू होते. त्याचा थांगपत्ता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला का लागला नाही, असा प्रश्न आरोग्य विभागाने उपस्थित केला आहे. त्यामुळे २००९ पासून कार्यरत संबंधित वैद्यकीय अधिकारी व अधीक्षकांची माहिती शासनाने मागवली आहे. या दरम्यान, कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, डॉ. नितीन रावते, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. राजेंद्र भंडारी, डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. बापूसाहेब नागरगोजे हेही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.