

नाशिक : आसिफ सय्यद
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक स्वरूपाची व नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती उपलब्ध होण्यासाठी राज्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या माध्यमातून ई- डिजिटल लायब्ररी स्थापन केली जाणार आहे. यासाठी आशियाई विकास बँकेकडून प्राप्त अनुदानातून ४७.१२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅबवर जागतिक दर्जाची वैद्यकीय पाठपुस्तके, साहित्य उपलब्ध होणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक स्वरूपाची व नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती उपलब्ध होणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बरीचशी पाठ्यपुस्तके, जर्नल्स, मॅगेझिन, शोधनिबंध, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित साहित्य व आनुषंगिक बाबींची दिवसेंदिवस वाढणारी किंमत विचारात घेता हे साहित्य संबंधित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असतात. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेली मुद्रित पुस्तकांची संख्या कमी असल्याने ही पुस्तके एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना वापरता येत नाहीत. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या वारंवार वापरामुळे लवकर खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे. ई- डिजिटल लायब्ररीमुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची अद्ययावत वैद्यकी साहित्य सहजरीत्या मोबाइल व टॅबवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत भर पडणार आहे. तसेच ही पुस्तके व शैक्षणिक साहित्यांची अद्ययावत, सुधारित आवृत्तीदेखील आपोआप प्राप्त होणार आहे. नॅकसारख्या संस्था आणि एनएमसी, एमसीआय, डीसीआय, आयएनसी यांसारख्या नियामक संस्थांसाठीही ई- लायब्ररीची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ई- डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यासाठी ४७.१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आशियाई विकास बँकेच्या अनुदानातून हा निधी खर्च केला जाणार आहे. या निधीतून ब्रॅण्डेड वेब आणि मोबाइल ॲप खरेदी केले जाणार आहेत. त्यामध्ये अद्ययावत व सुधारित आवृत्तीचे ई- बुक्स, ई- जर्नल्स, ई- शोधनिबंध, ध्वनिचित्रफिती आदी साहित्य विद्यार्थ्यांच्या मोबाइल, टॅबवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ई- डिजिटल लायब्ररी स्थापन केली जाणार आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जालना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग या महाविद्यालयांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ई- डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. ई- डिजिटल लायब्ररीसाठी कोणत्याही नवीन बांधकामाची, विद्युतीकरणाची तसेच नवीन पदर्निमितीची आवश्यकता असणार नाही. निविदा प्रक्रियेद्वारे डिजिटल लायब्ररी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.