

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील 'नाशिक इन' हॉटेलमधून एमडी (मॅफेड्रॉन) विक्री करताना पोलिस बॉईजसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून ३२ ग्रॅम एमडी पावडर आणि एकूण २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले संशयित शोएब मुराद खान (रा. हॅपी कॉलनी, वडाळा), शेख मुस्तफा अफजल (रा. खोडेनगर) आणि मोफीज मुज्जमील खान (रा. वडाळा चौक) यापैकी शोएब हा निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. एमडी विक्रीसाठी रूम क्रमांक ३०५ उपलब्ध करून देणारा हॉटेल मालक कपिल देशमुख हा मात्र फरार झाला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, 'नाशिक इन' हॉटेलच्या रूम क्रमांक ३०५ मध्ये काही संशयित व्यक्ती एमडी विक्रीसाठी उपस्थित असल्याचे समजले.
त्यानंतर उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, अंमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे तसेच उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ व जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी हॉटेलवर छापा टाकून तिघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ३२ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) किंमत अंदाजे १,६०,००० तसेच इतर साहित्य मिळून २,२३,३८० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या शोएब खान याने चौकशीत 'नाशिक इन' हॉटेलचा मालक कपिल देशमुख याने त्यांना एमडी विक्रीसाठी रूम क्रमांक ३०५ उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. त्यामुळे कपिल देशमुख याचा देखील या बेकायदेशीर ड्रग विक्री प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, तो सध्या फरार आहे.
सदर चौघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ नियंत्रण व प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सचिन चौधरी, विशाल पाटील, देवकिसन गायकर, संजय ताजणे, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.