Drug Peddlers : बापरे ! चक्क मेडिकल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी निघाले 'ड्रग्ज पेडलर्स'

धक्कादायक वास्तव : 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' पोलिसांसमोर मोठे आव्हान
ड्रग्ज पेडलर्स / Drug Peddlers
ड्रग्ज पेडलर्स / Drug PeddlersPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणारे कारखाने पोलिसांनी उद्धवस्त केल्यानंतर नाशिक शहरातीलही कारखान्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करीत माफीयांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, शहरातील एमडी तस्करी रोखण्यात पोलिसांना अद्यापही पूर्णत: यश आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मासिस्टचे विद्यार्थीच आता 'ड्रग्ज पेडलर्स' म्हणून पुढे येत असल्याने, 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' ड्रग्जच्या रॅकेटचे पाळेमुळे खोदून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने काठेगल्ली, पखालरोडवर रचलेल्या सापळ्यात पाच ड्रग्ज पेडलर्सला बेड्या ठोकल्या. यामध्ये एक इंजिनिअर, दुसरा फार्मासिस्ट व अन्य उच्चशिक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर रविवारी (दि.९) देखील पोलिसांनी एका हॉटेलमध्ये धाड टाकत तीन पेडलर्स ताब्यात घेतले. या तीनपैकी एकजण चक्क निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा पुत्र असल्याचे समोर आले. तर अन्य दोघेही शिक्षित असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ड्रग्ज पेडलर्स / Drug Peddlers
Thane Crime News | एमडी ड्रग्ज पेडलर्स अटकेत

ड्रग्ज माफिया उच्चशिक्षित मुलांचा ड्रग्ज पेडलर्स म्हणून वापर करीत असल्याचा पोलिसांना संशय असून, आणखी किती मुले या ड्रग्जच्या जाळ्यात ओढले गेले आहेत? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. धर्मनगरी असलेले नाशिक 'एज्युकेशन हब' म्हणून पुढे येत असून, नाशिकमध्ये उच्चशिक्षण देणाऱ्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासारखे दोन मोठे नामांकित विद्यापीठ आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये आहे. संदीप हे खासगी विद्यापीठही नाशिकमध्ये असल्याने, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह महाराष्ट्रभरातील विद्यार्थी नाशिकमध्ये उच्चशिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत.

बाहेरील बरेच विद्यार्थी भाड्याने खोली करून तसेच हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असून, याच विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढण्याचे काम माफियांंकडून केले जात आहे. व्यसन तसेच पैशांचे आमिष दाखवून या विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले जात असून, त्यांचा वापर पेडलर्स म्हणून केला जात आहे. मागील काही दिवसांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून ड्रग्ज माफियांनी आपले नेटवर्क शहरभर पसरविले असून, नाशिक नशेचे नवे डेस्टिनेशन ठरतेय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अगोदर महिला आता विद्यार्थी

नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचे मोठे नेटवर्क असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. या कारवाईत प्रारंभी महिला पेडलर्सचा सहभाग मोठा असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांकडून केल्या गेलेल्या कारवाईत सातत्याने महिला पेडलर्स आढळून आल्या. माफियांकडून ड्रग्ज विक्रीसाठी महिलांचा वापर केला जात असल्याचे पोलिसी कारवाईत सातत्याने समोर येऊ लागल्याने, माफियांनी आता ड्रग्ज विक्रीसाठी विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे दिसून येत आहे.

उच्चशिक्षणाचा असाही फायदा

नाशिकच्या ड्रग्ज विक्रीचे कनेक्शन परराज्यात असल्याचे यापूर्वीच्या कारवाईवरून समोर आले असून, परराज्यात ड्रग्ज विक्री करताना उच्चशिक्षित तरुणांचा माफियांना विशेष फायदा होत आहे. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान. तसेच तांत्रिक ज्ञान अवगत असल्याने, या तरुणांकडून ड्रग्ज विक्री करणे सहज शक्य होत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादासाठी देखील या तरुणांचा वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

विद्यार्थीच ग्राहक

अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाईला गोवणे सहज शक्य असल्याने, महाविद्यालये ड्रग्ज माफियांच्या नेहमीच रडारवर असतात. विद्यार्थ्यांना ड्रग्ज पेडलर्स बनविण्यापासून ते त्यांना नशेच्या आहारी नेण्याचे काम माफियांकडून केले जात आहे. पुढे हेच विद्यार्थी माफियांसाठी मोठे ग्राहक ठरत असल्याने, शिक्षण संस्थांनी देखील विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

विविध आकर्षणापोटी विद्यार्थी विक्री करण्याबरोबरच नशाही करीत असल्याचे तपासात समोर येत आहे. ज्या उच्चशिक्षित तरुणांना ताब्यात घेतले आहे, त्यांचा कोण वापर करतो काय? याबाबत सखोल तपास केला जात आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष द्यावे.

सुशिला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक

टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया यासारख्या माध्यमांवर सर्रासपणे व्यसन तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले जात असल्याने, किशोरवयीन मुलांवर त्याचा मोठा प्रभाव पडतो. मुलांमध्ये प्रगल्भता नसल्याने, गुन्हेगारी मानसिकतेचे लोक मुलांना एमडी ड्रग्जसारख्या व्यसनाच्या जाळ्यात अडकवतात. कॉलेजमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तर याचा सर्रास वापर होतो. नाशिकमध्ये मागील पाच वर्षांपासून एमडीचे जाळे विस्तारले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news