Marathi Bhasha Gaurav Din : मराठीचा गौरव, संस्कृतीचा अभिमान: मराठी भाषा गौरव दिन

'एक दिवसाचा गौरव साजरा करण्यापेक्षा आपली भाषा जपणं, बोलणं, शिकणं, संवाद करणं हे जितक्या प्रेमानं घडेल तितक्या आपली भाषा समृद्ध होईल.'
Marathi Bhasha Gaurav Din : मराठीचा गौरव, संस्कृतीचा अभिमान: मराठी भाषा गौरव दिन
Published on
Updated on

अंजली राऊत

नाशिक : मराठी भाषा गौरव दिन अर्थात कुसुमाग्रज यांनी आपल्या साहित्यकृतींमधून मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांच्या कवितांपासून नाटकांपर्यंत आणि कथांपर्यंत प्रत्येक साहित्यप्रकारात त्यांनी ठसा उमटवला. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची आठवण या निमित्ताने करण्यात येत आहे.

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची आणि ओळखीची शान आहे. जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीसारख्या भाषांचे महत्त्व मान्य करतानाच मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सर्व स्तरांतून मराठीचा अभिमान बाळगण्याचा आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.

Marathi Bhasha Gaurav Din : मराठीचा गौरव, संस्कृतीचा अभिमान: मराठी भाषा गौरव दिन
Marathi Boli Mahotsav | कालिदास नाट्यगृहात 'मराठी बोलींचा उत्सव'; विश्व मराठी संमेलनाची दमदार सुरुवात

मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो?

कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. 'विवेकसिंधू' हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.

अभिजात मराठी समृद्ध होण्यासाठी काय करावे....

मराठी भाषा मुले वाचत आहेत. 'झेन-झी' आणि 'झेन- अल्फा' ही पिढी वाचन करते. पण ही पिढी मराठी वाचतात का? हा मोठा प्रश्न उद्धभवतो. मराठी वाचनाची गोडी पण शालेय पातळीवरच लावली पाहिजे. मराठी भाषेतही भरपूर पुस्तके निर्माण होत आहेत. बालसाहित्यकार जसे माधुरी पुरंदरे, वर्षा नगरकर, राजीव तांबे आहेत. यांची वाचनीय पुस्तके आहेत. त्यामुळे कोवळ्या वयापासून दुसऱ्या ते तिसऱ्या वयोगटातील मुलांना छान चित्रांची, गोष्टींची मराठी भाषेची पुस्तके वाचायला द्यायला हवीत. मराठी अक्षर ओळख, देवनागरी लिपी आणि त्यातून मराठी भाषा ही सवयीची झाली की, मराठी भाषा अवघड वाटणार नाही. जेव्हा ती भाषा तुम्हाला आवडायला लागली की, मराठी भाषेतील साहित्यापासून मुले वंचित होणार नाही, ती मुले आपसुकच मराठी भाषेतील सुंदर पुस्तके वाचू लागतील. हजार दिड हजार पूर्वीची ही भाषा तेव्हा ही सगळे साहित्य आपली 'रसद' आहे. मुलांना भाषा कळायला लागली की, त्या भाषेची गोडी मुलांना लागेल. पालक आणि शिक्षक या दोघांकडून मुलांना मराठी भाषेचे धडे फिड करायला हवेत.

Marathi Bhasha Gaurav Din : मराठीचा गौरव, संस्कृतीचा अभिमान: मराठी भाषा गौरव दिन
Vishwa Marathi Samelan 2026: बोली भाषेमुळे महाराष्ट्र समृद्ध : मधू मंगेश कर्णिक

'जादूची पेटी' सारखे शालेय उपक्रम राबवा...

पूर्वी शाळेत 'जादूची पेटी' सारखे उपक्रम शाळेत राबवले जायचे. आठवड्याचा एक दिवस 'जादूची पेटी' सारख्या पेटीमध्ये भरपूर पुस्तके असायची आणि या एका दिवसात कोणते पुस्तक वाचायला मिळेल, याची उत्सुकता मुलांमध्ये असायची. आठवडाभर ते एक पुस्तक वाचायचे आणि पुढील आठवड्यात ते पुस्तक बदलून दुसरे पुस्तक वाचायचे. असे शालेय उपक्रम राबवून विश्व वाड्:मयातील गोष्टी पुस्तकरुपाने साहित्याची ओळख होत होती. निरनिराळ्या गोष्टी, गाणी आणि लेखक, लेखिका यांचे साहित्य, पुस्तकांच्या नावांच्या भेंड्या खेळणे. ज्यामध्ये एखाद्या पुस्तकाचे लेखकाचे नाव सांगा, अशा स्पर्धा घेणे, कोडी घालणे. दत्ता मर्ढेकर स्मारक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, केशवसुत अशा ठिकाणी मुलांच्या क्षेत्रभेट घडवून आणणे. त्यातून मुलांना कवींच्या गावातून त्यांचे जन्मस्थान, त्यांच्या बद्दलची माहिती मिळते. जसे की, पुणे, नाशिक येथे किती कवींची जन्मस्थळ आहेत, अशी प्रश्न मुलांना उपक्रमातून विचारता येतात. ज्यामुळे मुलांना 'हेरीटेज बॉक्स' मधून 'हेरीटेज'ला वळवता येईल. अर्धवट गोष्टी पूर्ण करा, त्यामुळे मुलांचा कल्पना विस्तार वाढतो. मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तेजन मिळायला पाहिजे.

भाषेचा गौरव दिन साजरा करणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असली तरी रोजची संवादभाषा म्हणून किती प्रमाणात मराठी भाषा वापरतो, त्यावर प्रेम करतो. एक दिवसाचा गौरव साजरा करण्यापेक्षा आपली भाषा जपणं, बोलणं, शिकणं, संवाद करणं हे जितक्या प्रेमानं घडेल तितक्या आपली भाषा समृद्ध होईल. भाषा वापरण्यावर भाषेचे अस्तित्व, संस्कृती जपणे अवलंबून असतं. निरनिराळ्या शास्त्रांमध्ये भाषेचा परिभाषा रुजवात केली, कोष निर्माण करुन त्याची सवय मुलांना लावली तरच भाषा टिकेल. मराठी वाचन वाढायला हवे. भाषा संवादातून आणि सर्जनशील कामांमध्ये असली तर साहित्य अधिकधिक रुढ होईल. झेन-जी ने ही भाषा स्विकारली आणि त्यांच्या प्रतिभेतून ती भाषा उतरली तरच शक्य होईल. पुढच्या पिढीने साहित्यात उतरण्यासाठी झेन- झी ने भाषा आपलीशी करायला पाहिजे. लहान मुलांना चांगल्या लेखकांची ओळख पुस्तकातून करुन द्या. छोट्या छोट्या गोष्टीतून सात्विक वाचन मुलांना वाचायला द्या. साहित्यातून जीवनाच्या अनुभवाकडे मुलांना वळवायला पाहिजे. भाषा अनेक प्रकारे वळवता येते, भाषेचे वाकवता येते, भाषेचे गमतीजमती मुलांना शालेय पातळीवरच समजले तर मराठी भाषा मुलांना कंटाळवाणी होणार नाही. मुलांना क्षमता असते की, ते दोन ते तीन भाषा सहजच आत्मसात करु शकतात. आई तमिळ आणि वडील बंगाली असतील तर मुलांना दोन्ही भाषा अवगत होते. मराठी भाषेची गोडी मुलांना लागावी म्हणून शिक्षक आणि पालक दोघांनी आग्रही असायला हवे. प्रेमात पडल्यावर कसं सगळ्या गोष्टी आत्मसात करतात, छोट्या गोष्टींकडे पण लक्ष देतात, तसे भाषेच्या प्रेमात पडलं की, भाषा आपसुकच आपली होते. मुलांना लहानपणापासून भाषेवर प्रेम करायला, भाषेतून खेळायला, अनुभव घ्यायला शिकवा. -

अरुणा ढेरे, अक्षय्य पुरस्कारार्थी साहित्यिक, कवयित्री, लेखिका.

नवोदित साहित्य बनू इच्छिणाऱ्या भावी पिढीने स्वतंत्र विचार, सामाजिक भान आणि विशेषत: एआय सारख्या सॉफ्टवेयरची मदत घेऊन नक्कल टाळावी, दमणकारी सत्तेविरुद्ध बोलण्याचे धाडस साहित्यिकांमध्ये असावे. संत तुकाराम आणि सानेगुरुजी यांच्यासारखे स्पष्ट आणि निर्भीड विचार मांडण्याची परंपरा जपली गेली पाहिजे, भाषेसाठी बोलण्याचे धाडस निर्माण होणे गरजचे आहे, अन्यथा साहित्य केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहील. मराठी भाषा टिकवण्यासाठी खोटा अभिमान नव्हे तर व्यवहार्य पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यास त्यांचे पालक आपसूकच मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत टाकतील. इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले जाते, कारण त्या भाषेत रोजगाराच्या संधी अधिक असल्याची धारणा पालकांमध्ये आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नसून अर्थकारणाशी जोडलेला आहे.

- डॉ. गणेश देवी, भाषातज्ज्ञ.

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेचा गौरव दिन साजरा होत असताना जुन्या-नव्या साहित्याला वाचकवर्ग वाढला पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने महिन्याला किमान दोन पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजे. पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय जनमानसात पुन्हा एकदा रुजली पाहिजे. आपण आपली बोलीभाषा सर्वार्थाने जपली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्याचे समाधान लाभेल.

-रवींद्र मालुंजकर, कवी आणि सूत्रसंचालक.

कोणत्याही मातृभाषेवर प्रत्येकाचे प्रेम असतेच. मराठी भाषेला त्या त्या भाषेतून भावाभावांचे अनेक कंगोरे आहेत. सुंदर अशा मराठी भाषा या मातृभाषेतून प्रत्येक घराघरातून बोलली गेली पाहिजे, तर मराठीला मरण येणार नाही. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकण्यासाठी पाठवले असले तरी घरी मात्र मराठीतूनच संवाद साधा. इंग्रजी भाषा येण्यासाठी मुलांसोबत इंग्रजी बोलू नका, ते शाळेतूनच होऊ शकते. मातृभाषेला विसरुन इतर भाषेची कास धरणे योग्य नाही. मराठी गौरव भाषा दिनानिमित्त भाषेचे महत्व समजून घेणे आणि देणे हे व्हायलाच पाहिजे.

- नरेश महाजन, ज्येष्ठ लेखक, सावाना माजी उपाध्यक्ष.

मराठी भाषेचा विस्तार होत आहे. संवादातून व्यवसाय आणि रोजगार निर्मिती होत आहे. आताच्या विश्व मराठी संमेलनातूनच याचा प्रत्यय येत आहे. संमेलनात होणारे मान्यवरांचे परिसंवाद आणि प्रमुख वक्ते हे मराठी भाषिक आहेत. यातूनच बोध घ्यावा की, मराठी भाषेला कोणताही अडसर नाही. मराठी भाषेतून प्रोत्साहन मिळत असल्यानेच संमेलनात देश आणि परदेशातूनही अनेकजण सहभागी होत आहे. मराठी भाषेला चांगला दर्जा मिळत असल्यानेच परदेशातही मराठी शाळा उभारल्या जात आहेत, संमेलनात देखील सुमारे २२ हजार विद्यार्थी सहभागी आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना देखील मराठी भाषेतून शिक्षण द्या.

- निलम शिर्के, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष. (भाषामंत्री उदय सामंत यांच्या पत्नी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news