

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी..
ग्रंथदिंडी, परिसंवाद, ग्रंथोत्सव, नाट्य अभिवाचन, काव्यस्पर्धा आदी कार्यक्रम, उपक्रमांनी अमृताहून पैजे जिंकणाऱ्या माय मराठीचा जागर विविध कार्यक्रमांनी करण्यात आला.
कुसुमाग्रजांचे निवासस्थानी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी हेमंत टकले, विलास लोणारी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अरविंद ओढेकर, हर्षवर्धन कडेपूरकर, ॲड. राजेंद्र डोखळे, संध्या धोपावकर, रंजना पाटील आदी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जि. प., जिल्हा ग्रंथालय संघ व सावाना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सवास गुरुवारी (दि.२७) प्रारंभ झाला.
मु. शं. औरंगाबादकर सभागृहात खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, अविनाश येवले, 'सावाना'चे कार्याध्यक्ष ॲड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, बालभवनप्रमुख सोमनाथ मुठाळ यावेळी उपस्थित होते. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेले ग्रंथालय व ग्रंथमित्रांचा सत्कार करण्यात आला.
ग्रंथोत्सवात सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन झाले. सावाना, मेनरोड, रविवार कारंजा, धुमाळ पाॅइंट या मार्गे दिंडीचा समारोप सावाना येथे झाला. यावेळी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मराठीचे फलकांच्या माध्यमातून माय मराठीचा जागर केला.
ग्रंथोत्सवात पहिल्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला 'मराठी भाषा व आजची पिढी' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यामध्ये अद्वैय गरुड, मैत्रेयी शुक्ल, श्रावणी आपटे, उत्कर्षा शिंदे, साधना धात्रक, भावना खैरनार, रोहित गोखले आदींनी सहभाग घेतला. अश्विनी भालेराव हिने समन्वयन केले.
संयुक्ता कुलकर्णी, बाळासाहेब गिरी, किरण भावसार, संजय गोऱ्हाडे, राजेंद्र सोमवंशी या साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहरातील अनेक शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लेखक व प्राचार्य राजेश्वर शेळके होते. करण बिडवे यांचे भाषण आणि प्रा. प्रसाद कराड यांनी “शूर आम्ही सरदार” गीत सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. व्ही. पी. वाणी, प्राचार्य डॉ. अनिल कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वस्त समीर भुजबळ व मार्गदर्शिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी उपक्रमास संदेशपर शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात मराठी दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य प्रा. डॉ. एम. व्ही. भालेराव व किशोर शिंदे, प्रा. डॉ. अमोल रासने, प्रा. डॉ. शिवाजी गवळी, प्रा. डॉ. सोनाली जाधव, प्रा. सतीश भदाणे, प्रा. जगदीश कापडणीस, प्रा. संकेत चोरडिया, प्रा. इंद्रजित सोनवणे, प्रा. डॉ. योगिता अहिरे, प्रा. डॉ. संदीप दिवे यावेळी उपस्थित होते. ग्रंथपाल संदीप दराडे यांनी प्रास्ताविक केले. धनश्री पैठणे आणि पार्थ सावळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली रायते यांनी आभार मानले.