

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि आज मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रजांच्या गावात साजरा होत आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांचे कार्य लक्षात घेता, पुढील वर्षापासून शिरवाडे वणीत त्यांच्या नावाने दोनदिवसीय मराठी महोत्सव साजरा करण्याची घोषणा करतानाच शिरवाडे गाव यापुढे कवितेचे गाव म्हणून ओळखले जाईल अशी घोषणा मराठी भाषाविकासमंत्री उदय सामंत यांनी केली.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकाससंस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी (ता. निफाड) यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव शिरवाडे वणी हे कवितांचे गाव म्हणून घोषित करणे व कवितेच्या दालनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष आ. दिलीप बनकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. डॉ. शोभा बच्छाव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, सरपंच दिलीप खैरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.
मंत्री सावंत म्हणाले की, मराठी भाषेत जसा संवाद वाढायला हवा, तशीच ती साहित्यातूनसुद्धा भावी पिढीला समजायला हवी म्हणून राज्यातील असा हा दुसरा उपक्रम आहे. भविष्यात दोन - तीन दालने उभी करून जास्तीत- जास्त पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. जेणेकरून कवितेच्या या गावाचा आदर्श इतर लोक घेतील. तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने सरकारने मागणी केल्यानुसार लवकरच अध्ययन केंद्र सुरू होणार आहे.
या दालनांच्या माध्यमातून कुसुमाग्रज यांचे साहित्य अभ्यासासाठी उपलब्ध होईल. शिरवाडे गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामपंचायतीने तयार करावा. त्यानुसार निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी यावेळी दिले. अध्यक्षीय भाषणात आ. बनकर यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणी जतन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
थोर कवी मंगेश पाडगावकरांचे उभा दांडा (वेंगुर्ले) हे गाव 'कवितेचे गाव' म्हणून विकसित केल्यानंतर शिरवाडे गावाला कवितेचे गाव हा बहुमान प्राप्त करून दिल्याबदल कुसुमाग्रज यांची नात पीयू शिरवाडकर यांनी शासनाचे विशेष आभार मानले.