

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदारांचेही बळ लाभले आहे. नाशिकचे शिवसेना (उबाठा) खासदार राजाभाऊ वाजे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठोपाठ देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवार (दि.२९)पासून जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. नाशिकमधूनही खासदार वाजे यांनी जाहीर पत्रक काढून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत, गरीब कुटुंबातील मुलांना नोकरी आणि शिक्षणात संधी मिळणे आवश्यक असल्याचे वाजे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा हक्क मिळावा आणि समाजाचा आत्मसन्मान अबाधित राहावा यासाठी आपला आंदोलनाला पाठिंबा असल्याचे वाजे यांनी नमूद केले आहे.
वाजेंसोबतच देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनीही मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शुक्रवारी नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांची भेट घेत, त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे आहिरे यांनी आंदोलकांना सांगितले. तसेच आपणही लवकरच आंदोलनात सहभागी होऊ, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले आहे.