Manoj Jarange Patil Shantata Rally : भगव वादळ | 'एक मराठा कुणबी मराठा; मराठ्यांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा'

Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik : शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; शहर भगवेमय
Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik
नाशिक : तपोवन येथून सीबीएस चौकापर्यंत निघालेल्या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाल्याने रस्ते गर्दीने व्यापून गेले होते.(छाया : हेेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटीतील तपोवन येथून शांतता रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी समाजबांधवांनी 'एक मराठा कुणबी मराठा; मराठ्यांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा' या घोषणांनी शहर दणाणून सोडले. रॅलीच्या निमित्ताने शहरातील वातावरण अवघे भगवेमय झाले होते.

जरांगे-पाटील यांनी आरक्षणासाठी राज्यभरात शांतता रॅली काढल्यानंतर मंगळवारी (दि.13) या रॅलीचा समारोप झाला. दुपारी दोनला जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. नवीन आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड येथे रॅली पोहोचली. यावेळी जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळातर्फे अडीच हजार किलोंचा हार घालून जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. रॅली रविवार कारंजा, रेडक्रॉस, अशोक स्तंभमार्गे जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रॅली पोहोचली. यावेळी जरांगे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी सीबीएस चौकात झालेल्या जाहीर सभेत समाजबांधवांचा उत्साह पाहावयास मिळाला.

Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik
नाशिक : आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या शांतता रॅलीत सहभागी मराठा समाज बांधव. (छाया : हेेमंत घोरपडे)
Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik
Nashik | मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज; स्वागतासाठी 16 फुटी हार
Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik
सकल मराठा समाजातर्फे रॅली मार्गावर ठिकठिकाणी पाणी, नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.(छाया हेमंत घोरपडे)

पाणी, नाश्त्याची सुविधा

सकल मराठा समाजातर्फे रॅली मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. रॅलीत सहभागी समाजबांधवांनी या स्टॉल्स‌ला भेट देत मसालेभात, वडा-पाव तसेच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

Manoj Jarange Patil Shantata Rally Nashik
रॅलीच्या नियोजनात परिश्रम घेणाऱ्या स्वयंसेवकांकडून बाहेरून आलेल्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस(छाया हेमंत घोरपडे)

स्वयंसेवकांकडून विचारपूस

रॅलीत सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई-पुण्याकडून मराठा बांधव दाखल झाले होते. रॅलीच्या नियोजनात परिश्रम घेणाऱ्या स्वयंसेवकांकडून बाहेरून आलेल्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जात होती.

पोवाडे-गीतांनी प्रतिसाद

शांतता रॅलीसाठी सीबीएस चौकात सकाळपासून समाजबांधव जमण्यासाठी सुरुवात झाली होती. समाजबांधवांचा हुरूप वाढविण्यासाठी शाहीर संतोष डुंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध पाेवाडे व गीते सादर केली. यावेळी डुंबरे यांना उपस्थित बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

शासकीय कामकाज थंडावले

सीबीएस ते अशोकस्तंभ मार्गावर दिवसभर असलेल्या गर्दीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे एरवी गजबजलेल्या जिल्हा मुख्यालयात शुकशुकाट होता. अभ्यागतांची वर्दळ नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फायली हातावेगळ्या करण्यावर भर दिला. तसेच जिल्हा न्यायालयातही तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

विक्रेत्यांना हातभार

सीबीएस ते मेहेर चौकापर्यंतची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील पदपथावरील विविध विक्रेते हटविण्यात आले होते. यादरम्यान, चणे-फुटाणे विक्रेत्यांनी जागा मिळेल तेथे आडोशाला दुकाने थाटली. रॅलीत सहभागी समाजबांधवांनी चणे-फुटाण्यावर ताव मारल्याने विक्रेत्यांना आर्थिक हातभार लागला.

Manoj Jarange Patil Shantata Rally Nashikअ
शांतता रॅलीत सत्तर वर्षाच्या आजी वेधले सगळ्यांचे लक्ष(छाया हेमंत घोरपडे)

आजींनी वेधले लक्ष

शांतता रॅलीत सत्तर वर्षाच्या आजी स्वत:च्या दुचाकी चालवित तपाेवन येथे पोहोचल्या. यावेळी आजींच्या उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा दिल्या. मराठ्यांना कमी लेखू नका. गरज वाटल्यास ७० वर्षाच्या आजीदेखील पुढे येऊ शकतात, असा संदेश देण्यात आला.

 रॅलीसाठी चक्क स्कुटीवरुन आल्या 70 वर्षाच्या आजी

रॅलीमुळे वाहतूक मंदावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तपोवन ते सीबीएस या मार्गावरून शांतता रॅली काढण्यात आली. खबरदारी म्हणून पोलिसांनी रॅली मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी वाहतूक मार्ग दिले होते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहतूक मार्ग बंद केले होते. पर्यायी मार्गांवर वाहनांची संख्या वाढल्याने सायंकाळपर्यंत वाहतुकीचा वेग मंदावला होता. रॅली संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

शहर पोलिसांनी रॅलीस येणाऱ्यांसाठी शहरात पाच ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली होती. तसेच चार मार्गांवरील वाहतूक बंद केली होती. रॅलीमुळे शहरातील शाळांनाही सुटी जाहीर केल्याने शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक बऱ्याच प्रमाणात कमी होती. तरीदेखील रॅलीत सहभागी होणाऱ्यांसह दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांमुळे मार्गांवर वाहनांची वर्दळ दिसत होती. पोलिसांनी सकाळपासूनच सभास्थळी येणाऱ्या चारही चौकांमध्ये बॅरिकेडिंग करून खासगी वाहनांना प्रवेश दिला नाही. त्याचप्रमाणे रॅली मार्गातही वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. मात्र, काही ठिकाणी पर्यायी मार्गांवर वाहने वाढल्याने तेथील वाहतूक मंदावल्याचे दिसले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news