नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप करण्यात आला. यासाठी शहर पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात केला होता. रॅलीमार्गात पोलिसांनी बॅरिकेडिंग, ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याने कुठेही अडचण आली नाही. तसेच सीबीएस चौकातही सभा सुरळीत पार पाडली. सायंकाळी पाचनंतर पोलिसांचा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या रॅलीसाठी जिल्ह्यातून मराठा बांधव शहरात दाखल झाले हाेते. त्यामुळे शहर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी सकाळी आठपासून बंदोबस्त नेमला. तपोवन मैदान येथून स्वामी नारायण चौफुली-पंचवटी डेपो-निमाणी बसस्टॅन्ड-मालेगाव स्टॅन्ड-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-सीबीएस या मार्गावरून रॅली निघाली. त्यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके, पद्मजा बढे, शेखर देशमुख यांसह पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष पथके, वाहतूकच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या पथकांचा बंदोबस्त तैनात होता.
बंदोबस्ताच्या सुलभतेसाठी पोलिसांनी रॅली मार्ग ते सभास्थळापर्यंत पाच सेक्टर तयार केले होते. त्यात २० पथके तैनात होती. मेहेर सिग्नलजवळ राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात होती. प्रत्येक १ ते २ हजार समाजबांधवांमागे पोलिसांचे १ पथक होते. एका पथकात १ अधिकारी व १० ते १५ अंमलदार होते. वायरलेस यंत्रणेवरून पोलिसांचा समन्वय होता. रॅलीमार्गावरील प्रमुख चौकांत 'फिक्स पॉइंट' तैनात होते.
पोलिस आयुक्त – १
पोलिस उपआयुक्त – ३
सहायक आयुक्त – ५
पोलिस निरीक्षक – ८
सहायक व उपनिरीक्षक – २३
पुरुष अंमलदार – २३९
महिला अंमलदार – ३७
होमगार्ड – २००
राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद पथक
रॅली सुरू झाल्यावर सेक्टरनुसार पथकांनी जागा घेत सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. रॅलीत साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात होती. राज्य राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीसह शहर पोलिसांच्या चार पथकांनी सीबीएस येथील सभास्थळाभोवती पहारा दिला. यासह नाशिक तालुका पोलिस ठाणे, गडकरी चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा, मेहेर सिग्नल चौकात प्रत्येकी चार पथकांनी ताबा घेतला. तसेच रॅलीत काळे झेंडे दाखवण्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांना ताब्यात घेतले होते. तर अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
मनोज जरांगे यांच्याभोवती मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पोलिसांची सुरक्षा साखळी उभारण्यात आली होती. त्यामध्ये सशस्त्र पोलिस अधिकारी व २० अंमलदार तैनात होते. हे सर्व जण साध्या वेशात मोर्चा सुरू झाल्यापासून अखेरपर्यंत जरांगेंच्या अवतीभवती तैनात होते.
रॅलीत चोरटे सक्रिय असल्याचे दिसून आले. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी माेबाइल, दागिने, पाकीट चोरल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी अद्याप चोरीच्या तक्रारी आल्या नसल्याचे सांगितले. तक्रार केल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.