

मालेगाव (नाशिक) : डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार व खुनाच्या घटनेने हृदय पिळवटून निघाले आहे. हे अमानवीय कृत्य आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडकाच आहे. या नराधमाचा १० दिवसात फैसला व्हावा. अन्यथा अकराव्या दिवसापासून याप्रश्नी तुम्ही जनआंदोलन सुरू करा. मी हजर असेल, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी येथे सांगितले.
डोंगराळे येथील पिडीत कुटूंबीय व ग्रामस्थांची भेट घेत सांत्वन करताना ते बोलत होते. त्याचवेळी जलदगती न्यायालयात अनेक खटले असतात. त्या पार्श्वभूमीवर जलदगती न्यायालयात लैंगिक अन्याय अत्याचाराच्या खटल्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशा खटल्यांचा निकाल शिघ्रतेने लावावा. नराधमांना धडा शिकवल्यास भविष्यात असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असेही ते म्हणाले. जरांगे या कुटूंबीयांचे सांत्वन करून बाहेर पडत असतानाच अन्न औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनीही तेथे हजेरी लावली. त्यांनी पिडीत मुलीच्या आई वडिलांचे सांत्वन करत या घटनेचा निषेध केला. शासन तुमच्या पाठीशी आहे. संशयीताला फाशी होईल. यासाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञ नेमण्याची सर्वांनीच सूचना केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा महासंघाचे अनिल पाटील, अमोल निकम, संजय महाले, जगदीश खैरनार, नंदू शेवाळे, शेखर पगार, चंद्रशेखर हिरे, प्रशांत पवार, गौरव शेलार उपस्थित होते.