

नाशिक : भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आठवणींना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उजाळा दिला आहे. सिंग यांच्यामुळे जिल्ह्यातील असंघटित कामगार, तरुणवर्ग, रुग्णांना अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष फायदा झाला. त्यांच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास ते शांततेने प्रश्न समजून घेत, त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत, असा अनुभव राजकीय पदाधिकाऱ्यांनी कथन केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी सांगितले की, इंटकचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात असंघटित कामगारांचा मेळावा झाला होता. त्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनीया गांधी आल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख व छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली असंघटित कामगारांचे शिष्टमंडळ सिंग यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले हाेते. त्यावेळी असंघटित कामगारांच्या विम्याचा प्रश्न सिंग यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यांनी गांभीर्याने विषय समजून घेत तातडीने विमा प्रश्न लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे असंघटित कामगारांच्या विम्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात यश आले.
याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनीही अनुभव सांगितला. २००४-२००९ या कालावधीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना सिंग यांच्यासाेबत अनेकदा भेट झाली. त्यावेळी त्यांनी युवकांना केंद्रस्थानी ठेवून संघटनात्मक सल्ले दिले. तसेच देशहित डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील योजना युवा वर्गासमोर मांडल्या. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार हमी योजना आदी योजना राबवल्या. सिंग यांनी लावलेल्या आर्थिक शिस्तीमुळे देशाला फायदा झाला, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान सिंग यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला कधीच अडचण आली नाही. आम्ही थेट दरवाजा उघडून संवाद साधायचाे. जिल्ह्यातील रुग्णांचे प्रश्न त्यांना सांगितल्यानंतर ते त्यावर तातडीने उपाय योजत. त्यांच्या या कृतीमुळे जिल्ह्यातील रुग्णांना मला सुमारे पाच काेटी रुपयांची मदत करता आली. भेटण्यासाठी आलेल्यांना सिंग यांनी कधीही नाराज केले नाही. गोरगरिबांनाही त्यांची भेट होत असे. सिंग यांच्या निधनाने देशातील चांगले व्यक्तिमत्त्व हरपले.
देवीदास पिंगळे, माजी खासदार, नाशिक.
भारतीय अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला कमी बोलणारा पण जास्त मिळवणारा सच्चा राजकारणी म्हणून इतिहास माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांना कायम स्मरणात ठेवेल. 1991 च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला लज्जास्पद ग्रहण लागले असताना, त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या आधारे अर्थव्यवस्थेला बळकटी देत देशाला आर्थिक संकटातून वाचविले.
कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक