

नाशिक : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अत्यंत धार्मिक वृत्तीचे, अत्यंत साधी राहणीमान असलेले होते. सर्वोच्च पदावर असूनही ते सुरक्षारक्षकांची नेहमीच आपुलकीने चौकशी करत असल्याच्या आठवणी त्यांचे सुमारे दहा वर्षे सुरक्षारक्षक अधिकारी असलेले मखमलाबाद येथील साहेबराव काकड यांनी जागवल्या.
काकड सीमा सुरक्षा दलात नियुक्ती झाल्यानंतर 'एसपीजी'मध्ये त्यांची निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुरक्षाव्यवस्थेत अधिकारी म्हणून ते नियुक्त झाले होते.
काकड यांनी माजी पंतप्रधान सिंग यांच्यासमवेत काही अनुभव सांगितले. डॉ. सिंग यांचा आहार हा शुद्ध आणि सात्त्विक म्हणजेच संपूर्ण शाकाहार होता.
पंतप्रधान म्हणून अनेक परदेशी समकक्ष किंवा अधिकाऱ्यांसमवेत शिष्टाचार भोजन घेत असताना बऱ्याच वेळा 'वाइन' त्यांच्यासोबत घेतली जाते, परंतु मनमोहन सिंग यांच्या ग्लासमध्ये पाणी असायचे. ग्लासमधील वाइन काढून घेण्याची जबाबदारी सुरक्षा अधिकाऱ्यांची असे. अनेकदा मी स्वतः त्यातली वाइन काढून त्यात पाणी ठेवले आहे. ग्लासातील ते पाणी घेण्यापूर्वी ते अधिकाऱ्यांकडे बघायचे आणि वाइन काढून घेतली आहे, अशी खूण केल्यानंतरच त्या ग्लासला हात लावायचे, अशी वेगळी आठवण काकड यांनी सांगितली.
पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रोटोकॉल्स असतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना ते एवढ्या उच्चपदावर असूनसुद्धा निमूटपणे ऐकत असत, असेही काकड यांनी सांगितले.
डॉ. मनमोहन सिंग यांचे प्राथमिक शिक्षण आजच्या पाकिस्तानमध्ये झाले होते. त्यामुळे यांची भाषणे उर्दूमध्ये लिहिली जात. भाषण देण्यापूर्वी सिंग हे नेहमी अगोदर तयार करून आणलेले भाषण वाचत असत.