

मनमाड (नाशिक) : शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या तब्बल 284 कोटी 24 लाख रुपये खर्चाच्या भूमिगत गटार योजनेला वर्क ऑर्डर मंजूर झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे शहरातील 162.17 किमी लांबीची भूमिगत गटारीचे जाळे उभारले जाणार आहे. यामुळे मच्छर, डास, घाण पाणी व दुर्गंधीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली.
आमदार कांदे म्हणाले की, मनमाडकरांनी मला सलग दुसऱ्यांदा विजयी करून पाठवले. या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प मी पहिल्याच कार्यकाळात केला होता. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी मी शासनाकडून 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. ती योजना आता पूर्णत्वाला पोहोचली आहे. औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा झाला असून आता शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, रोगराई पसरू नये यासाठी भूमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे.
नग्रोथान महाभियानांतर्गत ही योजना मंजूर झाली असून शहरातील 18 हजार 399 घरांना थेट याचा लाभ होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शहराच्या मलनिस्सारण समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधणे हा आहे. केवळ गटारींचे जाळेच नव्हे, तर सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी आधुनिक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. प्रक्रिया झालेल्या पाण्याचा योग्य उपयोग करण्याचीही तरतूद असून, 300 केपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पही उभारला जाणार आहे. त्यामुळे ऊर्जा साखळीतील शाश्वतता राखली जाईल, असेही कांदे यांनी सांगितले.
या प्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान, सागर हिरे, प्रमोद भाबड, नगर अभियंता अभिजीत इनामदार, पाणीपुरवठा विभागाचे दीपक पांडे, नगरपरिषद तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.