

मनमाड (नाशिक) : गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मनमाड बाजार समितीची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण सभा अखेर शुक्रवार (दि. १८) पार पडली. पणन संचालकांच्या आदेशानुसार झालेल्या या सभेत एकूण ९ महत्त्वपूर्ण विषय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये चार महिन्यांपासून रखडलेले कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे, बेकायदेशीरपणे निलंबित सचिवांचे निलंबन रद्द करणे, व्यापाऱ्यांचे परवाने नूतनीकरण करणे, १३६ हमाल मापारी यांचे लायसन्स रीनिव्ह करणे यांसारखे निर्णय विशेष ठरले.
सभापती दीपक गोगड हे अनुपस्थित राहिल्यामुळे गंगाधर बिडगर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरळीत पार पडले. यावेळी बाजार समितीत रिक्त झालेल्या संचालक पदावर रमेश कराड यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला.
दीपक गोगड यांनी ही सभा बेकायदेशीर ठरवावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून प्रकरण सध्या पणन संचालकांच्या अधिकारात असल्याचे नमूद केले. यासंदर्भात पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.
या सभेस गंगाधर बिडगर, संजय पवार, किशोर लहाने, कैलास भाबड, सुभाष उगले, विठ्ठल आहेर, दशरथ लहिरे, मधुकर उगले, आप्पा कूनगर, संगीता कराड, चंद्रकला पवार आदी सदस्य उपस्थित होते. सचिव बी. एल. गायकवाड, व्ही.के. घुगे, एम. जी. बाविस्कर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
बाजार समितीत सध्या आमदार सुहास कांदे यांच्या गटाकडे १२ संचालकांचे बहुमत असून, विरोधी गटाकडे ४ संचालक आहेत. त्यामुळे समितीत लवकरच सत्ता परिवर्तन घडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात जात आहे.