Manikrao Kokate Rummy Video | मंत्री कोकाटे यांच्या रमी व्हिडिओची पोलिस चौकशी
नाशिक: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळातील रमी खेळण्याच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांचे वकील ॲड. मनोज पिंगळे यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
पोलीस विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार असल्यामुळे सदर व्हिडिओ कोणी काढला?आमदार रोहित पवारांना कसा मिळाला? याबाबतचे सत्य उलगडणार आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करत राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती.
सत्ताधारी पक्षाकडून सुरुवातीला सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचे कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला. यामध्ये आज न्यायालयाने पोलीस चौकशीचे आदेश दिले आहे.

