

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?' असे वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केले आहे. मंत्री कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर मात्र आता, मी तसं बोललोच नाही, अशी सारवासारव कृषिमंत्र्यांनी केली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झाले आहे. जेवढं नुकसान झाले आहे, तेवढेच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाई देणार आहे.
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरले आहे, पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते. आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का? त्यामुळे फळबागा उभ्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढला. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? कांदे आणि फळ पिकाची पंचनामे करण्यास सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालं त्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.
ज्या पिकांचं नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे. जे काही खरं आहे ते मी बोललो आहे. ठीक आहे चुकलं असेल, पण तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात. मी काही वेगळं बोललो नाही, जे सत्य आहे तेच बोललो. ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याबाबत मी बोललो आहे, अशी सारवासारव कृषिमंत्री कोकाटे यांनी केली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (दि.28) सायंकाळी सिन्नर तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने पंचनाम्यांबाबत केलेल्या प्रश्नावर कोकाटे यांनी 'काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असा सवाल शेतकऱ्यालाच विचारला. तसेच शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.