

नंदुरबार : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा असे भडकाऊ वक्तव्य केले आहे. याचे पडसाद आता उमटत आहेत. क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी बच्चू कडू यांचे वक्तव्य म्हणजे बालिशपणा आहे अशी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. बच्चू कडू हे विरोधी पक्षात आहे निवडणूक हरलेले आहे त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून वेडे वाकडे वक्तव्य करतात. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असेही कोकाटे म्हणाले.
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करताना एक अत्यंत वादग्रस्त आणि भडकाऊ आवाहन केले आहे. आत्महत्या करण्याऐवजी थेट एखाद्या आमदाराला कापून टाकण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
सरकार जर शेतकऱ्यांच्या बरोबर नसते तर 37 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलेच नसतं. सरकारने केलेली मदत मोठी असली तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे पण सरकार म्हणून जे काम देवेंद्र फडणवीस सरकारने करायला पाहिजे ते केले आहे.
मतदारयादी मध्ये जर घोळ असतील तर विरोधी पक्षातील कार्यकर्ते काय झोपा काढतात का ? कुठल्याही निवडणुकीत मतदार यादी मध्ये हरकत घेण्याची मुदत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयां नंतर हे जागे झाले. त्याच्या अगोदर त्यांना मतदार यादीत घोळ का जाणवला नाही. आमचे कार्यकर्ते सजग असल्याने मतदार यादी मधला घोळ त्यांनी शोधून काढला आहे. आमच्याकडे बुथवर कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे बुथवर कार्यकर्तेच नाही. त्यामुळे विरोधी पक्ष करत असलेले हे सर्व आरोप राजकीय प्रेरित आरोप आहेत. अशी टीकाही कोकाटे यांनी केली.