

वैजापूर : शहरातील कृष्ण मंदिर परिसर, यशवंत कॉलनी, हुतात्मा जगन्नाथ कॉलनी आणि आदर्शनगर या भागात मोकाट कुत्र्यांनी रविवारी (दि.२३) दुपारपासून उशिरापर्यंत अक्षरशः हैदोस घातला. अचानक हल्ला करणाऱ्या या कुत्र्यांच्या टोळीने तब्बल दहा नागरिकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यात एका लहान चिमुरडी मुलीचा समावेश असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने उपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र रविवारची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. अनेक नागरिकांना हात-पाय, पोटरी व पायांच्या मागील भागावर कुत्र्यांनी चावे घेतले असून, त्यांच्यावर वैजापूर खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, लहान मुलीला चावा घेतानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कृष्ण मंदिर परिसरातील या मुलीवर कुत्र्याने अचानक झडप घालून तिला जखमी केले. तिच्या जखमेची तीव्रता लक्षात घेता तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणीजोर धरत आहे.